काय सांगता! चक्क कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून गेला, डॉक्टरांचे कानावर हात; हिंगोली जिल्ह्यातील प्रकार
Hingoli Corona Update : या घटनेने आरोग्य विभागात (Health Department) एकच खळबळ उडाली असून, या रुग्णाचा शोध घेतला जात आहे.
Hingoli Corona Update : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोके वर काढले असून, दिवसेंदिवस राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. असे असतांना हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला असून, चक्क कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयातून पळून गेला आहे. या घटनेने आरोग्य विभागात (Health Department) एकच खळबळ उडाली असून, या रुग्णाचा शोध घेतला जात आहे. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली असून, पोलिसांचे पथक देखील या व्यक्तीला शोधत आहे.
हिंगोली शहरातील जिल्हा रुग्णालयात रविवारी एक कोरोनाचा संशयीत रूग्ण तपासणीअंती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यास रुग्णालयात दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, हा रुग्ण कुणालाही काहीही न सांगताच जिल्हा रुग्णालयातून पळून गेला. शेवटी संशयित रूग्ण दिसत नसल्याने डॉक्टरांनी त्याची शोधाशोध केली. परंतु, सोमवारपर्यंत तरी तो सापडला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
छातीत दुखत असल्याने आला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला...
राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आता शासकीय रुग्णालयात संशयित रुग्णाची कोरोना चाचणी केली जात आहे. दरम्यान, हिंगोली शहरातील जिल्हा रुग्णालयात रविवारी एक व्यक्ती छातीत दुखत असल्याने उपचारासाठी आला होता. त्याला दम्याचा त्रास असल्याने, त्याची तपासणी केली असता, तो कोरोना संशयित आढळला. सुरवातीला त्याला औषधी देण्यात आल्या. सोबतच, पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, पुढील उपचार न घेताच हा रुग्ण दवाखान्यातून निघून गेल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांचे कानावर हात
शासकीय रुग्णालयातून कोरोनाचा संशयित रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या रुग्णावर प्राथमिक उपचारही करण्यात आले होते. मात्र, आता काही डॉक्टर चक्क कानावर हात ठेवत मला काही माहितीच नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे आता या रुग्णाचा शोध घेऊन, त्याच्यावर उपचार करण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान असणार आहे.
पोलिसांकडून देखील शोध सुरु...
शासकीय रुग्णालयातून कोरोनाचा संशयित रुग्ण पळून गेल्याची चर्चा आरोग्य विभागात दिवसभर सुरु होती. बऱ्याच ठिकाणी शोध घेऊन देखील तो सापडला नाही. दरम्यान, शेवटी पोलिसांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांकडून या रुग्णाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या दिवशी सोमवारपर्यंत हा रुग्ण हाती लागला नव्हता. घडलेल्या प्रकाराबद्दल मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, पण आता चर्चा झाल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )