Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Nashik Lok Sabha : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून त्यात हेमंत गोडसेंचे नाव नाही. यावर हेमंत गोडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shiv Sena First Candidate List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर 8 उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा करण्यात आली. मात्र या यादीत नाशिकचे (Nashik) विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे नाव आले नसल्याने नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेमंत गोडसे म्हणाले की, दोन-तीन टप्प्यात याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. आम्हाला विश्वास आहे की, दुसऱ्या टप्प्यात आमचे नाव यादीत असेल. तसेच आमच्या इतरही खासदारांची नावे लवकरच जाहीर होतील असे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच नाशिकची जागा सुटेल
नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळदेखील (Chhagan Bhujbal) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तुम्हाला सोडून त्यांना संधी मिळेल का? अशी विचारणा केली असता हेमंत गोडसे म्हणाले की, महायुतीचे सर्वच नेते यावर चर्चा करून निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच ही जागा सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दोन ते तीन दिवसात दुसरी यादी जाहीर होईल
सर्व विद्यमान खासदारांचे नाव पहिल्या यादीत आहे. मात्र तुमचे नाव नाही, यामागे काय कारण असू शकतं, अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, नाशिकची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहेत. 20 मे रोजी नाशिकची निवडणूक होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि इतर खासदारांची यादी निश्चितच पुढच्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल, असेही त्यांनी म्हटले.
आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास
पहिल्या यादीत 8 उमेदवारांची घोषणा झाली. दुसऱ्या यादीत आकडा वाढेल का? यावर हेमंत गोडसे म्हणाले की, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. आमची मागणी एकूण 18 खासदारांची होती. त्यामुळे त्याच्या जवळपासच आम्हाला जागा मिळतील. आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या