(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ऑडिटोरियम समोरील दुकाने तोडली नाही तर मी स्वतः येऊन तोडेन', खा. प्रफुल्ल पटेल यांचा गोंदिया नगरपरिषदेला इशारा
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियाच्या विकासासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला मास्टर प्लॅन करायला सांगितला. तसंच ऑडिटोरियम समोरील दुकानं तोडली नाही तर मी स्वत: येऊन दुकानं तोडेने असा इशारा दिला.
गोंदिया : चौथ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना गोंदियात येताच शहराच्या विकासाची आठवण का झाली असा प्रश्न गोंदियाकरांना पडला आहे. निमित्त होतं गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत बांधण्यात आलेल्या पार्किंग प्लाझाच्या लोकार्पणाचं. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पार्किंग प्लाझाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी गोंदिया शहराचा विकास करायचा असेल तर गोंदियाकरांना आपली मानसिकता बदलायला हवी, असा मौलिक सल्ला देखील द्यायला खा पटेल विसरले नाहीत.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यावर भडकले. त्यांना गोंदियाच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सांगितलं. सोबतच ऑडिटोरियम समोरील दुकानं तोडली नाही तर मी स्वत: येऊन दुकानं तोडेन, असा इशारा त्यांनी नगरपरिषदेला दिला.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या प्रवासाची सुरुवात गोंदिया नगरपरिषदेच्या अध्यक्षापासून केली. आज त्यांचं देशात नावलौकिक झालं. मात्र 33 वर्षांच्या राजकारणात गोंदियाचा हवा तसा विकास करता आला नाही, याची खंत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मनात कायम आहे. मात्र माझ्या एकट्यामुळे गोंदिया शहराचा विकास शक्य नसून गोंदियाकरांना देखील आपली मानसिकता बदलायला हवी, असं पटेल म्हणाले. तर गोंदियाचा विकास साधायचा असेल तर गोंदियाचा मास्टर प्लॅन तयार करायला हवा, असं देखील पटेल यांनी म्हटलं
गोंदिया शहरात तयार करण्यात आलेल्या ऑडिटोरियमच्या समोरील दुकानं तोडून हॉलचं नूतनीकरण करा, अन्यथा मी स्वतः येऊन ती दुकाने तोडेन, अशी धमकीवजा इशाराही खासदार पटेल यांनी गोंदिया नगरपरिषदेला दिला. गोंदिया शहरात पाहण्यासारखं काही नाही. बाहेरील लोकांना जेव्हा आम्ही गोंदियात घेऊन येतो तेव्हा शहरातील अतिक्रमण दाखवू काय? असा तिखट सवालही त्यांनी आजी माजी नेत्यांसह अधिकाऱ्यांना विचारला.
त्यामुळे खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक धमकीला नगरपरिषद खरंच मनावर घेऊन ऑडिटोरियम समोरील दुकानं तोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत करेल काय हे पाहण्यासारखे असेल.