Gondia News: तब्बल 27 महिन्यांपासून मानधन रखडल्याने गोंदियात परिचारकाने संपवले आयुष्य, कुटुंबीयांचे ग्रामपंचायातीसमोर आंदोलन
Gondia News: ग्रामपंचायत परिचारकाचा मृतदेह ग्रामपंचायत समोर ठेवून कुटुंबीयांनी आंदोलन केले आहे. 27 महिन्यांपासून मानधन रखडल्याने परिचारीकेने विष प्राशन करत आयुष्य संपवले आहे.
Gondia News: गोंदिया (Gondiya) तालुक्यातील ग्रामपंचायत इर्री येथे परिचारक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील 27 महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. यातून आलेल्या नैराश्यातून या परिचारकाने चक्क ग्रामपंचायतीच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यानंतर त्या परिचारकाला उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या परिचारकाचा मृत्यू झाला. रमेश ठकरेले असे आत्महत्या करणाऱ्या परिचारकाचे नाव आहे. परिचारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका ग्रामपंचायतच्या समोर ठेवून आंदोलन केले. प्रशासनाने याची दखल घेत कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ग्रामपंचायत समोरून हटविण्यात आला.
27 महिन्यापासून रखडले होते मानधन
इर्री ग्रामपंचायतीने मागील 27 महिन्यांपासून ठकरेले यांना वेतन दिले नाही. ग्रामसेवक नरेश बघेले यांच्या उदासीन धोरणामुळे इर्री ग्रामपंचायत डबघाईस गेली आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसेवकाने मागील 27 महिन्यांपासून परिचारकाला वेतन न दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. तुटपुंजे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येते, परंतु ते तुटपुंजे मानधनदेखील परिचरकाला देण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या परिचारकाने विष प्राशन करून आत्महत्या केली.परिचारक म्हणून काम करत असलेले रमेश हे जेव्हा आपल्या वेतनासंदर्भात विचारायचे तेव्हा त्यांना 'तुला जे हवं ते कर, तुला वेतन मिळणार नाही, नाहीतर कामावरुन काढून टाकू अशा धमक्या देण्यात येत होत्या. या सगळ्याचा मानसिक तणाव रमेश यांना आला आणि त्यांनी त्यांचा जीवनप्रवास संपवला. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.
'दोषींवर गुन्हा दाखल करा'
काम करूनही परिचारकाला वेळेवर वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर आणि त्याच्या आत्महात्येस जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक)ने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. इर्री येथील ग्रामपंचायत परिचारकांना मागील 27 महिन्यांचे वेतन न दिल्याने भविष्य निर्वाह निधी खात्यातही नियमित रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही. वेतनाची मागणी केल्यावर कामावरून काढून टाकण्याची धमकी या परिचारकांना देण्यात आली. त्यामुळे आर्थिक संकटात व कर्जबाजारी झालेल्या कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.