HSC Examination : कसलं कॉपीमुक्त अभियान? केंद्र प्रमुखाकडून पैसे घेऊन कॉपीची मुभा, गडचिरोलीतील व्हिडीओ व्हायरल
HSC Examination : गडचिरोलीत परीक्षा केंद्र प्रमुखाने कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
HSC Examination: एका बाजूला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (Maharashtra Board) कॉपी मुक्त परीक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे परीक्षेत गैरप्रकार सुरूच आहेत. बुलढाण्यात मास्तरांनीच 12 वीचा गणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असताना दुसरीकडे आणखी एका घटनेने शैक्षणिक वर्तुळ हादरलं आहे. राज्यभर बारावीच्या परीक्षेत गैरप्रकाराची चर्चा होत असताना गडचिरोलीतही शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरणात सहकार्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चक्क केंद्रप्रमुखाने कॉपी करू देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून प्रत्येकी पाचशे रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरातल्या शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील प्राध्यापकाची कॉपी वसुली उजेडात आली आहे. पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षागृहात कॉपी करू देण्याची मुभा देण्याचा प्रकार धक्कादायक आहे. बोर्डाचे भरारी पथक येण्याआधी तातडीने सूचना देण्याचीही माहिती व्हिडीओत सांगितली जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने आरोपी शिक्षक किशोर कोल्हे यांना केंद्रप्रमुख पदावरून हटविले आहे. या संपूर्ण वायरल व्हिडीओची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी राजेंद्र निकम यांनी दिले आहेत.
परीक्षा केंद्र अचानकपणे बदलले विद्यार्थ्यांना मनस्ताप
बारावीचे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली. नांदेडमधील वाजेगाव येथे हा प्रकार घडला. वाजेगाव मधील राष्ट्रमाता उच्च माध्यमिक महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू आहे. आज जीवशास्त्राचा पेपर होता. विद्यार्थी वेळेवर या परीक्षा केंद्रावर आले. तेव्हा त्यांना तुमचं परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. याच गावातील जिल्हा परिषद शाळेत या विद्यार्थ्याना परीक्षा देण्याची सोय करण्यात आली. दहावी आणि बारावीचा पेपर एकाच दिवशी आणि एकाच वेळी आल्याने राष्ट्रमाता उच्च माध्यमिक महाविद्यालयात सगळ्याच विद्यार्थ्याना बसण्याची व्यवस्था नव्हती. त्यामूळे बारावीच्या 126 विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली. काही विद्यार्थ्याना परीक्षेसाठी काही मिनिटे उशीर झाला. दरम्यान गावातच दुसरे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे, कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय झाली नाही अथवा अडचणदेखील आली नाही असा दावा शिक्षण विभागातून करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI