गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, दोन जहाल नक्षलवाद्यांना ठोकल्या बेड्या
Gadchiroli news update : गडचिरोली पोलिसांनी हैदराबाद येथून दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर दहा लाख रूपयांचे बक्षित ठेवण्यात आले होते.
Gadchiroli news update : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli police) हैदराबाद ( Hyderabad ) येथून दोन जहाल नक्षलवाद्यांना ( naxalites) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे. 2006 पासून हे दोन्ही नक्षलवादी फरार होते. त्या दोघांवरही शासनाने दहा लाख रूपयांचे बक्षीस ठेवले होते. टुगे उर्फ मधुकर चिन्हना कोडापे ( वय 42 जि. गडचिरोली ) आणि श्यामला उर्फ जामणी मंगलु पूनम ( वय 35 छत्तीसगड ) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांची नावं आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर हा 2002 मध्ये अहेरी नक्षल दलममध्ये सहभागी झाला. जीमलगट्टा, अहेरी, सिरोंचा दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत राहून तो फरार होता. त्याच्यावर आठ चकमकी, दोन दरोडा, चार जाळपोळ, एक खून असे 25 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शासनाने आठ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. तर जामणी ही अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत पाच चकमकी, एक जाडपोळ, एक दरोडा असे नऊ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. गेल्या वर्षभरापासून गडचिरोली पोलिस या दोघांवर पळत ठेवून होते. दोघेही आपली ओळख लपवून हैदराबाद येथे राहत होते. याबाबत गडचिरोली पोलिसांना गुप्त माहिती मिळताच आज सोमवारी दोघांनाही हैदराबाद येथून अटक केली.
दरम्यान, आज महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून बोरतलाव पोलिस चौकीअंतर्गंत असलेल्या भागात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारत दोन पोलिस शहीद झाले आहेत. तर एकजण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. सोमवारी सकाळी बोरतलाव पोलिस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्यासाठी गेले होते. चहाचे ठिकाण पोलिस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावरील ढाब्यावर होते. तेथे आधीच काही नक्षलवादी दबा धरुन बसले होते. पोलिस कर्मचारी ढाब्यावर पोहोचताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन पोलिसांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी झाला. जखमी पोलिस कर्मचाऱ्याने या घटनेबाबत पोलिस ठाण्यात माहिती कळली. इतर पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दुचाकीला आग लावून घटनास्थळावरून पळ काढला.
महत्वाच्या बातम्या