(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Youth Congress : अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर युवक कॉंग्रेसच्या तौसिफ खान विरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 'वजन' असलेल्या युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा आश्रय मिळाल्याने कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता IYC यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूरः गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत वय कमी दाखविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा उपयोग केल्याप्रकरणी शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष तौसिफ खान बशिर खानच्या विरोधात तहसील पोलिसांनी 420 सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी या प्रकरणावर दुजोरा दिला असून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात फिर्यादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी वसीम खान नईन खान यांनी या संदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकेवर सुनावणीदरम्यान पोलिसांना तौसिफच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबर 2021मध्ये पार पडलेल्या युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत तौसिफने त्याचे वय 34 असल्याची नोंद केली होती. मात्र, वसीम खानच्या दाव्यानुसार तौसिफने निवडणुकीत वसीम खान दुसऱ्या क्रमांकावर होते. वसीमने पुराव्यादाखल तौसिफचा 28 ऑक्टोबर 1989चा पासपोर्ट व महानगरपालिकेकडून प्राप्त झालेला त्याचा जन्माचा दाखला सादर करत तो 39 वर्षाचा असल्याचे सिद्ध केले आहे.
संपर्क होऊ शकला नाही
तौसिफच्या या प्रकरणाची तक्रार वसीम खानने युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही, महाराष्ट्राचे युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे केली होती.यासाठी एका समितीचे गठनही करण्यात आले होते. या संदर्भात युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तौसिफ खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नागपूर युवक काँग्रेसमध्ये दुफळी
कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्यावेळी आपआपल्या उमेदवारांसाठी सर्वच नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. यासाठी मोर्चेबांधणी करुन नियोजनही करण्यात आले होते. दरम्यान तौसिफ खान यांनी वयाचा पुरावा म्हणून दाखल केलेले कागदपत्र बनावट असल्याचा आरोपही यावेळी झाला होता. मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 'वजन' असलेल्या नागपुरातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा आश्रय मिळाल्याने त्यावेळी कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता कॉंग्रेस यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.