Nagpur : विरोधाला न जुमानता अतिक्रमणाचा सफाया; अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
मनपाच्यावतीने शहरातील विविध झोन अंतर्गत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाला. मात्र पोलिसांच्या ताफ्यामुळे कारवाई थांबली नाही.
नागपूरः शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलेल्या नियोजनानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. फुटपाथ आणि अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमणधारक आणि पथकात अनेक ठिकाणी वादही झाले तर शाब्दिक चकमकही झाली. मात्र अतिरिक्त पोलिस बंदोबस्तामुळे कारवाईत अडथळे आले नाही.
मनपाच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने हनुमाननगर झोन क्षेत्रातील नंदनवन रोडवरील किर्ती अपार्टमेंटलगत अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता येथील अतिक्रमण हटविले. तसेच शहरातील अन्य भागातही ही मोहीम राबविली. पथकाने मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक दरम्यानचे अतिक्रमण हटविले. यावेळी एक ट्रक साहित्यही जप्त करण्यात आले. त्यानंतर पथकाने नंदनवन रोडवरील किर्ती अपार्टमेंट येथे पोहोचले. फुटपाथवरील काउंटर हटविण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्यांनी कारवाईला विरोध केल्याने कोतवाली पोलिस स्टेशनचा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त बोलावून कारवाई करण्यात आली. पथकांनी वेगवेगळ्या झोनमध्ये अतिक्रमण विरोधात मोहीम राबविली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आठ रस्ता चौक ते ऑरेंजसिटी हॉस्पिटल चौक दरम्यानचे अतिक्रमण हटविले. दोन ठेले जप्त करण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीसीए मैदान ते सिव्हिल लाईन कार्यालय दरम्यानचे अतिक्रमण हटविण्यात आले. धंतोली झोनअंतर्गत मेडिकल ते वंजारी नगर, रामेश्वरी रोड ते शताब्दी चौक ते ओंकार नगर चौक दरम्यानचे 32 अतिक्रमण हटविले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मारवाडी चौक ते शांतीनगर घाट, कापड मार्केट दरम्यानचे 26 अतिक्रमण हटवून 2 ट्रक साहित्य जप्त केले.
बांधकामही तोडले
नेहरूनगर झोनअंतर्गत नंदनवन येथील प्लॉट क्रमांक 1485 मध्ये पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. झोन कार्यालयाने नोटीस बजावली होती. पथकाने अनधिकृत बांधकाम पाडून 5 हजारांचा दंडही वसूल केला.
इतर बातम्या