राज्यपाल बहुमत चाचणीच्या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षांची नेमणूक करु शकतात! ज्येष्ठ विधिज्ञांचं मत
Maharashtra Political Crisis : राज्यपाल संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत उद्याच्या बहुमत चाचणीचे अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात असं ज्येष्ठ विधिज्ञ जुगलकिशोर गिल्डा यांनी म्हटलंय.
Maharashtra Political Crisis : भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. त्यानंतर शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता या प्रकरणावर आज सायंकाळी 5 वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. दरम्यान ही बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचं बोललं जात असतानाच ज्येष्ठ विधिज्ञ जुगलकिशोर गिल्डा यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
एबीपी माझाशी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ जुगलकिशोर गिल्डा यांनी म्हटलं की, बहुमताचा निर्णय विधिमंडळात होऊ शकतो अशा आशयाचे अनेक निर्णय यापूर्वीही देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या प्रकरणांमध्ये न्यायालयांनी दिलेले आहे. बिहार किंवा कर्नाटक किंवा मध्यप्रदेश अशा अनेक प्रकरणांमध्ये न्यायाधीशांनी बहुमताची चाचणी विधिमंडळात घेण्यासंदर्भात राज्यपालांच्या निर्देशांना योग्य म्हटले होते अशी माहिती जुगलकिशोर गिल्डा यांनी दिली आहे.
यापूर्वी न्यायाधीश केहर यांच्या घटनापीठाने सभागृहाच्या विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांच्याऐवजी हंगामी अध्यक्ष यांनी बहुमत चाचणीसाठीच्या विधिमंडळ अधिवेशनाची कारवाई पाहावी असे निर्णय दिले होते.
त्याचा आधार घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत उद्याच्या बहुमत चाचणीचे अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात असेही गिल्डा म्हणाले. अशा वेळेस सभागृहातील सर्वात जास्त अनुभवी आमदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते, असं जुगलकिशोर गिल्डा यांनी दिली आहे.
ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्याच अध्यक्षतेखाली, सूत्रांची माहिती
सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, उद्या होणारी ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता नाही अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या