Dhule Shirpur : अन् या झोळीत देशाचं भविष्य! धुळ्यात गर्भवती महिलेला झोळीत घालून सहा किलोमीटरची पायपीट
Dhule : धुळ्यात (Dhule) शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला, अन् आज चादरची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं!
Dhule News : एकीकडे शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शासन आपल्या दारी' (Shasan Apalya Dari) आल्याचा आव आणत आहे. घरबसल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असेही सांगत आहे. मात्र त्याच दुसऱ्या बाजूला आजही राज्यातील अनेक भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवरच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात धुळ्यात (Dhule) मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला, यात धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्य शासनातर्फे 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबविला जात आहे. दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील (Dhule District) शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथील गर्भवती महिलेला झोळी करून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. रस्त्याची सोयच नसल्याने थुवानपाणी येथील गर्भवती महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथील आरोग्य केंद्रात दाखल केलेले आहे.
शिरपूर (Shirpur) तालुक्यातील उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी व निशाणपाणी या दुर्गम क्षेत्रात येण्याजाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात. येथील लालबाई मोतीराम पावरा या महिलेला प्रसूतीकळा होऊ लागल्याने, प्रसुतीसाठी (Delivery) रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी नातेवाइकांनी बांबूची झोळी बनवून त्यात गरोदर महिलेला टाकून निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी हे अंतर 3 किलोमीटरचे अंतर पायपीट करत आणण्यात आले.
सहा किलोमीटर झोळीतून प्रवास
निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी डांबरी रस्ता नसल्याने येथे रुग्णवाहिका पोहोचत नाही. यामुळे सदर महिलेला निशाणपाणी ते थुवाणपाणी 3 किलोमीटर व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी 3 किलोमीटर असे एकूण 6 किलोमीटरचा रस्ता झोळीत पार करण्यात आला. त्यानंतर तेथून या महिलेला गुऱ्हाळपाणी येथून अंबुलन्सने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रसूती होऊन बाळ व त्या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे अशा प्राथमिक सुविधा नसल्याने या नागरिकांना रोजचाच जीवन मरणाचा संघर्ष करावा लागत आहे.
जिप सीईओंच्या भेटीनंतरही हालच....
तीन ते चार महिन्यांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी या क्षेत्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देखील थुवाणपाणीपर्यंत पायी चालत यावे लागले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही रस्त्याबाबत काही कारवाई न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायमचं आहे. या दुर्गम भागात रस्त्याची सुविधा पुरवावी, अशी मागणी होत आहे.