Nashik News : नाशिकच्या शासन आपल्या दारीपासून भाजप राष्ट्रवादी दूर, शासकीय कार्यक्रम मात्र शिवसेनेचा बोलबाला
Nashik News : नाशिकच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या तीन झेंड्यांनंतर भाजप आणि राष्ट्रवादीचा एक झेंडा दिसून येत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
Nashik News : तीनच दिवसांपूर्वी धुळ्यामध्ये (Dhule) आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे (NCP) झेंडे न लावल्याने अजित दादांनी भर भाषणात (Ajit Pawar) नाराजी व्यक्त केली होती. आता उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही चूक सुधारण्यात तर आली आहे. मात्र इथे वेगळंच चित्र बघायला मिळत आहे. कार्यक्रम शासकीय असला तरीही शिवसेनेचा बोलबाला दिसून येत असून भाजप आणि राष्ट्रवादी मात्र या कार्यक्रमाबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम दोन तारखा रद्द झाल्यानंतर अखेर उद्या शनिवार रोजी होत आहे. नाशिक (Nashik) शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार असून शासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची मेहनत घेतली जात आहे. मात्र या सगळ्यात भाजप, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, आमदारांकडून याकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र आहे.
तीन दिवसांपूर्वी धुळ्यात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रम शिवसेना (Shivsena) भाजपच्या झेंड्यामुळे चर्चेत आला होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भाजप आणि शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीचे झेंडे काही दिसत नसल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच उद्या होत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून कार्यक्रमस्थळी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळासह शहरभर झेंडे लावण्यात आले आहेत, मात्र यात शिवसेना वरचढ असल्याचे दिसत आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे अधिक झेंडे सर्वत्र झळकत आहेत. शिवसेनेच्या तीन झेंड्यांनंतर भाजप आणि राष्ट्रवादीचा एक झेंडा दिसून येत असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.
भाजपा, राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ
राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारमध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असले तरी, शनिवारी नाशकात होणाऱ्या शासन आपल्या दारीच्या यशस्वीतेची जबाबदारी जणू काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरच असल्याचे चित्र शहरात दिसू लागले असून, या कार्यक्रमाला लाभार्थी निश्चित करून त्यांना ने-आण करण्यापासून ते शहरभर फलकबाजी करण्यात शिंदे गटाने ताबा घेतला आहे. त्यामानाने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादीच्या गोटात या उपक्रमाविषयी उदासीनताच दिसून आली आहे. हा कार्यक्रम तसे पाहिला तर शासकीय असून, राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अलीकडेच सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यात सहभाग असणे अपेक्षित मानले गेले आहे; परंतु भुसे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बोलाविलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे भाजपा, राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.