Dhule News : अवैध सावकार राजेंद्र बंबने विमा पॉलिसीतून मिळवलं पाच कोटीचं कमिशन, स्वत:सह कुटुंबियांच्या नावे 125 मालमत्ता
धुळ्यातील अवैध सावकारने राजेंद्र बंबने स्वत:सह कुटुंबियांच्या नावे 125 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. सोबतच विमा पॉलिसीतून पाच कोटी 40 लाख रुपयांचं कमिशन मिळाल्याचं तपासात समोर आलं आहे.
धुळे : धुळे शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याची विविध मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याच तपासाचा एक भाग म्हणून राजेंद्र बंब आणि त्याच्या कुटुंबियांनी तब्बल 125 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने 5 हजाराहून अधिक नागरिकांच्या विमा पॉलिसी काढल्या असून त्याचे त्याला पाच कोटी 40 लाख रुपयांचे कमिशन मिळाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला विमा कंपनीने दिले आहे.
धुळे शहरातील रहिवासी असणारा राजेंद्र बंब हा अवैध सावकारी करत होता. त्याच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने त्याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर अवैध सावकारीचे पितळ उघडकीस आले. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी जाऊन राजेंद्र बंब याची मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यात रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने तसेच काही विदेशी चलन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची, दुकानही हिसकावले... धुळ्यातील अवैध सावकारीला चाप कधी बसणार?
हा तपास अधिक खोलवर व्हावा यासाठी आर्थिक गुन्हा शाखेने उपनिबंधक कार्यालयाला देखील पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र बंब आणि त्याच्या कुटुंबियांनी 125 मालमत्ता खरेदी केल्या असून त्या स्वतःसह इतरांच्या नावाने घेण्यात आल्या आहेत. 2010 पासूनची ही आकडेवारी मिळाली असून राजेंद्र बंब आणि त्याची पत्नी हे दोघेही विमा एजंट आहेत त्यांनी. आतापर्यंत विमा कंपनीतून सुमारे पाच कोटी 40 लाख रुपयांचे निव्वळ कमिशन मिळवले असून जिल्ह्यातील जवळपास पाच हजार 229 नागरिकांची विमा पॉलिसी काढली आहे.
राजेंद्र बंब आणि त्याच्या कुटुंबीयांनी खरेदी केलेली 125 मालमत्ता नेमक्या कुठे आहेत आणि त्या कोणत्या पद्धतीने मिळवल्या आहेत, याबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात त्याची अचलस्वरुपाची आणि किती मालमत्ता आहे याबाबतची माहिती देखील आर्थिक गुन्हा शाखेने पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रकांकडे मागितली असून ती माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
राजेंद्र बंब याला मालमत्ता विक्री करणाऱ्यांनी ती मालमत्ता स्वच्छेने विक्री केली आहे का? याबाबत देखील आर्थिक गुन्हा शाखेकडून तपास केला जाणार आहे. ज्या नागरिकांच्या एलआयसी पॉलिसी काढण्यात आल्या आहेत त्या नागरिकांना कर्ज घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती का याबाबतची देखील माहिती घेऊन त्या दिशेने देखील तपास केला जाणार आहे.