Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
Dhule Accident : सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत धुळे शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असली तरी या ठिकाणी सर्रासपणे ही वाहतूक होत असल्याचं दिसतंय.
धुळे : पुणे शहरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच धुळ्यातही अशीच एक घटना घडली आहे. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने 18 वर्षाच्या युवकाचा जीव घेतला आहे. राहुल योगेश सूर्यवंशी असं मयत झालेल्या युवकाचं नाव असून ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. दरम्यान, शहरात नियमबाह्य अवजड वाहनांची वाहतूक होत असून पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात हेदेखील समोर आलं.
रविवारी दुपारच्या सुमारास धुळे शहरातील एलएम सरदार हायस्कूल परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या बारा चाकी ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन राहुल योगेश सूर्यवंशी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राहुल सूर्यवंशी हा दत्त मंदिर चौकातून दुचाकी वाहनवरून घराकडे जात असताना ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकला नागरिकांनी शहरातील पंचवटी परिसरात अडवून ट्रक चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल योगेश सूर्यवंशी हा तरुण ट्रकच्या मागील चाकात आल्याने तो चिरडला गेला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. राहुलच्या वडिलांचे विश्वकर्मा गॅरेज नावाचे शहरात प्रसिद्ध दुकान आहे. धुळ्यातील या अपघातामध्ये राहुलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांचे अवजड वाहनांकडे दुर्लक्ष
शहरात सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे. असं असताना देखील दुपारच्या सुमारास ही अवजड वाहने शहरातून जात असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच आता 18 वर्षाच्या तरूणाला जीव गमवावा लागला.
नाशिकमध्ये डंपर विहिरीत कोसळला, चालकाचा मृत्यू
शेत जमीन लेव्हलिंगचे काम सुरू असतांना शेतातील विहिरीचा अंदाज न आल्याने डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटून डंपर विहिरीत पडल्याने 19 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय सुभाष दळवी असे मयत चालकाचे नाव आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण या गावी शेत जमीन लेव्हलिंगचे काम सुरू होते. डंपरमध्ये माती आणून ती शेतात टाकण्याचे काम सुरू असताना शेतातील विहिरीचा अंदाज न आल्याने डंपर विहिरीत कोसळला. या दुर्दैवी अपघातात चालक अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अक्षय नांदगाव तालुक्यातील चींचविहिर या गावातील रहिवासी होता.
ही बातमी वाचा: