Sion Hospital Accident : उपचार घेऊन निघालेल्या महिलेचा भरधाव गाडीने चिरडल्याने मृत्यू, सायन हॉस्पिटलच्या डीनला अटक
Sion Hospital Accident : शुक्रवारी रात्री झालेल्या अपघाताचा तपास पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सुरू केला आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या डीनच्या गाडीनेच त्या महिलेला धडक दिल्याचं समोर आलं.
मुंबई : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर राज्यात अनेक ठिकाणी अपघातांची मालिकाच पाहायला मिळत आहे. मुंबईत सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरेंच्या कार धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायन हॉस्पिटसलच्या गेट नंबर सातवर शुक्रवारी रात्री 8.30 वाजता हा अपघात घडला. मात्र अपघाताच्या 14 तासांनंतर डीनकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान अपघाताप्रकरणी राजेश डेरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून सायन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
रुबेदा शेख (वय 60) असं मृत झालेल्या महिलेचं नाव असून त्या शुक्रवारी सायन रुग्णालयातून उपचार घेऊन घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरेंच्या निष्काळजीमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. राजेश डेरे यांच्या विरोधात सायन पोलिसांनी कलम 304 A, 338, 177, 279, 184, 203 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तपास लागला
डॉ. राजेश डेरे यांनी या अपघाताबद्दल माहिती पोलिसांपासून लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र महिलेच्या बॉडीवर असलेल्या जखमावरून पोलिसांनी अपघाताचा अँगलने तपास सुरू केला. या भागातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर डॉ. डेरेंच्या कारमुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायन पोलिसांनी राजेश डेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या मालिका सुरूच असल्याचं दिसतंय. पु्ण्यामध्ये एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना उडवलं. त्यानंतर तशीच काहीशी घटना नागपुरातही घडली. तीन मद्यधुंद तरूणांनी नागपुरातल्या गर्दीच्या महल परिसरात बेजबाबदार पद्धतीने गाडी चालवली आणि तिघांना उडवलं. तर आता सायन हॉस्पिटलच्या डीनने महिलेला धडक मारत तिचा जीव घेतला.
कल्याणीनगरमध्ये नागरिकांची श्रद्धांजली
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात नाहक बळी गेलेल्या मृतकांना शनिवारी कल्याणीनगरमधील नागरिकांनी मेणबत्या लावून श्रद्धांजली वाहिली. गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी दोन निष्पाप तरुण-तरूणीला एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत बेदरकारपणे उडवलं होतं त्याच ठिकाणी आज श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे, तर त्याच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी तर आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: