(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : ओमराजे निंबाळकर 100 बापाचा, त्याच्या तिकीटासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटी दिले, निवडून आणलं; शिंदेंचे मंत्री तानाजी सावंत यांनी टीकेची पातळी सोडली
Tanaji Sawant Vs Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर यांच्या तिकिटासाठी उद्धव ठाकरे यांना 10 कोटींचा चेक दिला, निवडून आणलं आणि त्याने आता बाप बदलला अशी टीका राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी केली.
धाराशिव : कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणाचे राज्याचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. ओमराजे निंबाळकर हा 100 बापाचा, त्याला निवडून आणण्यासाठी 10 कोटींचा चेक दिला होता अशा शब्दात तानाजी सावंत यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली असून धाराशिवचा बेरोजगार असा निंबाळकर यांचा त्यांनी उल्लेख केला.
ओमराजेंनी आपला बाप विसरला, सावंतांची टीका
तानाजी सावंत म्हणाले की, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दहा कोटीचा चेक दिला आणि लोकसभेत निवडून आणलं. परंतु ओमराजे आपला बाप विसरून टीका करू लागले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर किती बापाचे असा जाहीर सवाल तानाजी सावंत यांनी विचारला.
काय म्हणाले तानाजी सावंत?
ओमराजे निंबाळकरांवर टीका करताना तानाजी सावंत म्हणाले की, ओमराजे निंबाळकर शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना भावनिक करतात. त्यांनी मराठवाड्यातील, धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी काय केलं? निवडून यायचं आणि पाच वर्षे इकडे फिरकायचं नाही असं यांचं काम. ही कालची पीढी, बेरोजगार खासदार. याचा मी एक बाप होतो, त्याच्या आधी दोन बाप होते. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे बाप झाले. यांचे किती बाप झाले हे माहिती नाही. मी त्या शंभर बापाच्या पोराला विचारतो, तुझ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना 10 कोटींचा खर्च केला, तुला निवडून आणलं. निवडून आल्यावर याने बाप बदलला. आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचं नाही.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी खासदार ओमराजे निबांळकरांनी तानाजी सावंत आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी निंबाळकरांवर विखारी टीका केल्याचं दिसून आलं.
शिंदे गटाच्या नेत्यांची वक्तव्यं, एकनाथ शिंदे अडचणीत
राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी या आधीही अशी वादग्रस्त वक्तव्यं केली आहे. अशी वक्तव्यं करणारे हे शिंदे गटाचे पहिलेच नेते नाहीत. त्या आधी अनेकांनी अशी वक्तव्यं केली आहेत. आमदार संतोष बांगर यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी विरोधकांबद्दल अपशब्द वापरल्याचं दिसून येतंय. अशा वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील अडचणी मात्र वाढत असल्याचं दिसतंय.
ही बातमी वाचा:
VIDEO : Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : 100 बापाच्या पोराला प्रश्न... तानाजी सावंतांची निंबाळकरांवर टीका