Dharashiv Crime : विवाहित महिलेचा लग्न करण्यास नकार, छातीत-डोक्यात बंदुकीची गोळी झाडून हत्या
Dharashiv Crime News : भूम तालुक्यातील चिंचपूर ढेगे शिवारातील एका शेतात बुधवारी सकाळी या महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, विवाहित महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्या छातीत आणि डोक्यात बंदुकीची गोळी झाडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. भूम तालुक्यातील चिंचपूर ढेगे शिवारातील एका शेतात बुधवारी सकाळी या महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अमृता अमोल बावकर (वय 26 वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे. तर लक्ष्मण ऊर्फ लखन नवनाथ नागने असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
ऊसाच्या शेतात साडीत गुंडाळलेला मृतदेह आढळला होता
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर ढगे येथील संभाजी सुरवसे यांच्या शेतातील ऊसामध्ये साडीत गुंडाळलेला एका विवाहित महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान माहिती मिळताच भूम पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळचं पंचनामा केला असता, महिलेची गोळी मारुन हत्या करण्यात आल्याचं दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी महिलेची ओळख पटवत, तातडीने तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान मयत अमृता बावकर यांनी आरोपी लक्ष्मणसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने त्याने हत्या केल्याचं समोर आले.
नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील पुनावळे येथे वास्तव्यास असलेल्या लक्ष्मण ऊर्फ लखन नवनाथ नागने याने 18 ते 26 एप्रिल या कालावधीत अमृता हीस गावातीलच संभाजी सुरवसे यांच्या शेतातील ऊसामध्ये बोलावून घेतले. दरम्यान अमृता या तिथे गेल्यावर लक्ष्मणने त्यांना लग्न करण्यास गळ घातली. मात्र आपण विवाहित असल्याने अमृता यांनी त्याला लग्नास नकार दिला. याचा त्याला प्रचंड राग आला. त्यामुळे चिडलेल्या लक्ष्मण नागने याने अमृता यांच्या छातीत आणि डोक्यामध्ये थेट बंदुकीने गोळी झाडली. ज्यात अमृता यांचा जागीच मृत्यू झाला. अमृता यांची हत्या केल्यावर लक्ष्मणने मृतदेह साडीमध्ये गुंडाळून ऊसाच्या शेतात टाकून दिला. त्यानंतर तो फरार झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत या सर्व प्रकरणाचं उलगडा केला आहे. तर या प्रकरणात मयत अमृताचे पती अमोल अनिल बावकर यांनी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास भूम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
डॉक्टरांच्या तात्पुरत्या बदल्यांवर कायमचे निर्बंध; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जारी केले निर्देश