(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : धनगर आंदोलनातील ते दोघे बेपत्ता, जलसमाधीच्या चिठ्ठीने धाकधूक वाढवली; पण दोघेही नदीकाठी तराफ्यावर झोपा काढताना सापडले
Dhangar Reservation : नेवासा फाटा येथे सुरु असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणातून दोन आंदोलक अचानक बेपत्ता झाले होते. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती.
अहमदनगर : सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar News) नेवासा फाटा येथे गेल्या 10 दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. मात्र सरकार या आंदोलनाची दाखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला होता. त्यातच गुरुवारी दोन आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाले होते. आम्ही जलसमाधी घेत आहोत. यास सर्वस्वी सरकार जबाबदार अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीकाठी (Godavari River) आढळून आली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून दोघेही आंदोलक पोलिसांना सापडले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरच्या नेवासा फाटा (Newasa Phata) येथे गेल्या 10 दिवसांपासून धनगर समाजाचे उपोषण सुरु आहे. काल या उपोषणामधून दोन आंदोलक अचनक बेपता झाले होते. प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे असे या आंदोलकांची नावे आहेत. 'आम्ही जलसमाधी घेत आहोत. यास सर्वस्वी सरकार जबाबदार' अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली होती. या दोघांचे फोन देखील कालपासून नॉटरीचेबल होते. तर गोदावरी नदीकाठच्या पुलावर चपला आढळल्या होत्या. यामुळे त्यांनी नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात होती.
स्थानिक मच्छीमारांना नदी काठावर सापडले आंदोलक
या दोन आंदोलकांचा पोलीस कालपासून शोध घेत होते. आंदोलकांनी उडी मारल्याची चर्चा रंगल्यानंतर पोलिसांनी याबाबत स्थानिक मच्छीमारांना माहिती दिली होती. अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन मच्छीमारांना करण्यात आले होते. त्याप्रमाणे सकाळी 8 वाजता स्थानिक मच्छीमारांना नदीच्या काठावर दोघेही जिवंत अवस्थेत सापडले. त्यानंतर मच्छीमारांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात
त्यानुसार दोघे आंदोलक गोदावरी पुलापासून पूर्वेस 2 किमी अंतरावर म्हाळापूर (ता. नेवासा) शिवारात चप्पूवर झोपलेल्या अवस्थेत जीवंत सापडले आहेत. गेल्या 24 तासापासून बेपत्ता असलेल्या या दोन आंदोलकांना नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चिखलात पायपीट करीत नदी काठावरून जाऊन ताब्यात घेतले आहे. आता या आंदोलकांनी नेमकी पाण्यात उडी मारली होती की नाही? याबाबत पोलिसात तपासात स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या