Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Dharmaveer 2 : धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची सर्वांनाच उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता या चित्रपटाची प्रतीक्षा संपली असून आजपासून धर्मवीर 2 प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
नाशिक : धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर 'धर्मवीर 2'ची (Dharmaveer 2) सर्वांनाच उत्सुकता सर्वांनाच लागली. हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र आता या चित्रपटाची प्रतीक्षा संपली असून अखेर धर्मवीर 2 प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आज पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी राज्यभरात शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा एकेकाळचे खास मित्र राहुल कनाल (Rahul Kanal) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासाठी आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
नाशिकच्या (Nashik News) चित्रपटगृहातदेखील शिवसैनिकांची मोठी रीघ पाहायला मिळाली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवसैनिक चित्रपट गृहात दाखल झाले. यावेळी शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल (Rahul Kanal), शिवसेना उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाकडून धर्मवीर 2 हा चित्रपट मोफत दाखविला जात आहे.
काय म्हणाले राहुल कनाल?
यावेळी राहुल कनाल म्हणाले की, या चित्रपटातून युवा समाजाला एक शिकवण मिळावी. विरोधक महाराष्ट्रात जे फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. त्याच्यासाठी या चित्रपटात एक उत्तम लाईन आहे ती म्हणजे 'चुकीला माफी नाही', असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चित्रपट सुरु होण्याआधी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.
धर्मवीर 2 शिवसैनिकांमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करेल : अजय बोरस्ते
यावेळी अजय बोरस्ते म्हणाले की, ज्या चित्रपटाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो, प्रतीक्षा करत होतो तो क्षण आलेला आहे. माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचं दुसरं नाव. त्यांचाच वारसा ज्यांनी चालवला ते आदरणीय दिघे साहेब. त्यांच्या जीवनपटावर असलेला हा चित्रपट आहे. दिघे साहेब हे वाघ होते. दिघे साहेबांची कार्यशैली जर आज कुठे दिसत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दिसते. धर्मवीर 2 हा चित्रपट एक वेगळी ऊर्जा सर्व शिवसैनिकांमध्ये निर्माण करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा