मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनीना सुनावले खडे बोल; आमदार रवी राणांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) देखील उमटतांना दिसले आहे.
CM Eknath Shinde मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) देखील उमटतांना दिसले आहे. यापुढे प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या योजनेवर त्याचा परिणाम पडतो. सोबतच या वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांनाही आयता फायदा होतो. त्यामुळे बोलताना सर्वांनी विचार करून बोला, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुनावले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल
महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात केली. सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी काल एक धक्कादायक वक्तव्य वक्तव्य केलं होतं. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे.
मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी काल सोमवारी केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा काल अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार पलटवार केला. परिणामी आज मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला, असे खडे बोल सुनावले आहेत.
लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?
दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महायुतीच्या समन्वय बैठक आज पार पडत आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात तीनही पक्षाची पदाधिकाऱ्यांची या समन्वय बैठकीला हजेरी असणार आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यातली महायुतीचे खासदार,आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत, भाजपकडून आमदार प्रसाद लाड, सचिन जोशी, आशिष कुलकर्णी, संजय खोडके इत्यादि प्रमुख नेते या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.
महत्वाचे म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून प्रहारचे आमदार आणि गेल्या काही दिवसापासून सरकारवर निशाणा साधणारे बच्चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याने अनेक चर्चाना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे महायुतीतील उच्चपदस्थ नेते आमदार रवी राणांवर नाराज तर नाही ना? असा प्रश्नही या निमित्याने आता उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या