मोठी बातमी! अहमदनगर जिल्ह्यातून सोडलेलं पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात
Jayakwadi Dam : अहमदनगरच्या निळवंडे धरणातून सोडलेले पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) दाखल होण्यास सुरवात झाली असून, रात्री उशिरा जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पाणी दाखल झाले आहे. अहमदनगरच्या निळवंडे धरणातून (Nilwande Dam) सोडलेले पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर, जायकवाडी धरणात पाणी दाखल होण्यास सुरवात झाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे नाशिक (Nashik) धरणातून सोडण्यात आलेलं पाणी मात्र जायकवाडीत आज दाखल होणार आहे.
दरम्यान, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडतांना प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे, पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदीकाठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सोबतच, वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. तसेच, अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे 8.6 टीएमसी पाण्यापैकी अधिकाधिक पाणी जायकवाडीत पोहचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे.
असे सोडले जाणार पाणी...
शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.
प्रत्यक्षात पोहचणार 5 टीएमसी
मागील तीन-चार वर्षांपासून सतत अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ज्यात, नाशिक, नगरमधील गंगापूर, गोदावरी- दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे. मात्र, 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरीही प्रत्यक्षात 5 टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. त्यामुळे 35 टक्के पाणी वाया जाणार आहे. तर, एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी 44 ते 45 टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: