Marathwada Water Issue : अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश
Marathwada Water Issue : शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दारणा धरणातून 100 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.
नाशिक : बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर अखेर नाशिकमधील (Nashik) धरणांमधून जायकवाडीत (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दारणा धरणातून 100 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. लवकरच नाशिक व अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यांतील धरणांमधून हळूहळू विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (Godavari Marathwada Irrigation Development Corporation) जायकवाडीसाठी 8.6 टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर याला झालेला विरोध आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर प्रत्यक्षात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
पाणी सोडतांना प्रशासनाची 'अशी' तयारी...
- पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदीकाठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
- वीजपुरवठा खंडित करणे, पोलीस बंदोबस्त देणे याबाबतची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
- अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
कुठल्या धरणातून किती पाणी
शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.
प्रत्यक्षात पोहचणार 5 टीएमसी
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ज्यात नाशिक, नगरमधील गंगापूर, गोदावरी- दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे. मात्र, 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरीही प्रत्यक्षात 5 टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. त्यामुळे 35 टक्के पाणी वाया जाणार आहे. तर, एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी 44 ते 45 टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.
मराठवाड्याला मोठा दिलासा
यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशात शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकं धोक्यात आली आहे. त्यामुळे वरील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत होती. अखेर प्रत्यक्षात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: