Chhatrapati Sambhajinagar : नामांतर विरोधी आंदोलनात 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar : समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोस्टर झळकवणाऱ्या विरोधात कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या (Chhatrapati Sambhajinagar District) नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात सुरु असलेल्या उपोषणात 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवण्यात आल्याची घटना शनिवारी समोर आली होती. दरम्यान याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत होती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या सिटी चौक पोलिसात चार अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कलम 153 (अ) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर याच उपोषणादरम्यान शनिवारी काही तरुणांनी 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवले होते. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच, यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान अखेर पोलिसांनी आंदोलनात 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर उपोषणाच्या ठिकाणी 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवल्याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता या चारही अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
उपोषणाचा दुसरा दिवस!
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णय झाल्याने या निर्णयाला आता विरोध देखील होत आहे. दरम्यान यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शनिवारपासून औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीकडून साखळी उपोषण केले जात आहे. तर याच उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यासाठी आज देखील मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या ठिकाणी काही महिलांनी देखील आज हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तर खासदार इम्तियाज जलील देखील याठिकाणी उपस्थित असून, त्यांनी उपोषणाला बसलेल्या नागरिकांना संबोधित केले. तसेच आज देखील काही काही संघटनांनी या उपोषणाला पाठींबा दिला आहे.
इतर संबंधित बातम्या:
Chhatrapati Sambhajinagar: मोठी बातमी! नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज