Chhatrapati Sambhaji Nagar : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा इशारा
Chhatrapati Sambhaji Nagar : सण उत्सवावेळी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी यावेळी दिला.
Chhatrapati Sambhaji Nagar: आगामी सार्वजनिक सण उत्सव ज्यामध्ये रामनवमी, महावीर जयंती, डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद अनुषंगाने जिल्हास्तरीय मध्यवर्ती शांतात समितीची बैठकीचे बुधवारी (29 मार्च) रोजी आयोजन करण्यात आले होते. सण उत्सवावेळी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी यावेळी दिला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्यावतीने (Chhatrapati Sambhaji Nagar Rural Police) शहरातील एम.जी.एम. कॅम्पसच्या आर्यभट्ट सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey), ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (Maneesh Kalwaniya) यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कलवानिया म्हणाले की, महापुरूषांची अथवा धार्मिक मिरवणुक काढतांना स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ घातल्यास अगर धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचे विरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच यामध्ये आयोजकांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांना सुध्दा यामध्ये आरोपी केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
सोशल मीडियाचा योग्य वापर करा...
जिल्हयात सर्वत्र डी. जे. वाजवण्यास पुर्ण: बंदी असल्याने नागरिकांनी किंवा मिरवणुक संयोजकांनी मिरवणुकीकरता पारंपारीक वाद्यांचा वापर करावा जेणे करून ध्वनी नियंत्रण कायद्याचा भंग होणार नाही. सध्या तरुणाई मध्ये अवैध बॅनरबाजी करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ज्यामुळे धार्मिक भावना दुखावणारे तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे मजुकर प्रकाशित करणे, ते सोशल मीडियाचे माध्यमातून स्टेटसला ठेवणे, पुढे पाठवणे अश्या प्रकारच्या वृत्तीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. स्वत:चा धर्म किंती प्रभावी हा दाखविण्यासाठी तरूण मुलांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. ज्यामधून इतरांच्या धार्मिक भावना दुखाल्या जाऊन दोन धर्मात तेढ निर्माण होतात. यामुळे गावामध्ये तणावयुक्त विस्फोटक वातावरण निर्माण होते. ज्यामुळे अशा तरूण मुलांचे विरूद्ध कायदेशीर गुन्हे दाखल होऊन त्यांचे चारित्र्यावर कायमस्वरूपी गुन्हयाची नोंद केली जाते ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगल्या नोकरी अथवा व्यवसायाची संधीला मुकावे लागते.
संपुर्ण मिरवणुकीचे व्हिडीओग्राफी करणार
जिल्हा पोलीस यंत्रणा या सण उत्सवाचे अनुषंगाने सर्तक असून सर्व पोलीस ठाण्यास मनुष्यबळ वाढवण्यात येणार असून सर्व मिरवणुक मार्गावर सी.सी.टि.व्ही. कॅमेरासह, पोलीसही संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडीओग्राफी करणार आहेत. यासाठी पोलीस ठाणे स्तरावर नागरिकांच्या शांतात समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असून त्यामाध्यमांतुन नागरिकांना मार्गदर्शन करून कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊन गावातील शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेणे बाबत व त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती देणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.
अनाधिकृत पुतळा बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
सध्या जिल्हयात महापुरूषांचे रात्री अवैधपणे विना परवानगी अनाधिकृतपणे पुतळे बसविण्याचे प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. प्रशासनाच्या संयमी भावनेचा गैर फायदा घेण्यात येत आहे. पण यापुढे अनाधिकृत पुतळा बसविण्याच्या प्रवृत्तीला कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असा गंभीर इशार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :