(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री 1 च्या सुमाराला दोन गटांत राडा झाला असून खासगी आणि पोलिसांच्या एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: रामनवमीच्या (Ram Navmi 2023) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस (Aurangabad Police) जखमी झाल्याचंही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्यात आला. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
पाहा व्हिडीओ : Ram Navami 2023 : Ch. Sambhaji Nagar मध्ये दोन गटात राडा, परिस्थिती नियंत्रणात
गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त (Ram Navami 2023) शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या किऱ्हाडपुरातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास काही कारणावरून दोन गटांत वादाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला आणि शिवीगाळापर्यंत पोहोचला. त्यानंतर हा वाद आणखी पुढे गेला. पुढे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलीस रस्त्यावर होते. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात काही पोलीसदेखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुरा परिसरात काही समजकंटकांनी राडा घातला असल्याचे समोर आले आहे. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी केले आहे. तसेच पोलिसांकडून कायदा मोडणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं देखील पोलीस आयुक्त म्हणाले.