Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : एकीकडे खैरेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, दुसरीकडे महायुतीचा उमेदवारचं ठरेना; संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं!
Lok Sabha : संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं असून, महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अशात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात येत आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, अजूनही महायुतीमधील काही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. ज्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) देखील समावेश आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते केले जाणार आहे. दुसरीकडे महायुतीत संभाजीनगरची जागा नेमकी कोणत्या पक्षाकडे याचाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं असून, महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीमधील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात आज शहरातील समर्थनगर भागातील सावरकर चौकात खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत आहे. यावेळी संजय राऊत उपस्थित राहणार आहे. सोबतच शरद पवार गटासह काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते देखील उपस्थित राहणार आहे.
महायुतीचा उमेदवार कोण?
महायुतीमध्ये संभाजीनगरच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेसह भाजपकडून देखील या जागेवर दावा केला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेदेखील या जागेसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजूनही संभाजीनगरचा तिढा कायम आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे.
भागवत कराडांचे जोरदार प्रयत्न....
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड देखील इच्छुक आहेत. यासाठी मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून तयारी सुरु आहे. मंत्री असतांना त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. त्यातच मागील काही दिवसांत भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली असून, त्यामुळेच भाजपकडून संभाजीनगरच्या जागेवर दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते देखील या जागेसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेत दोन गट झाल्याने सेनेची ताकद देखील कमी झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे भागवत कराड यांच्या उमेदवारीबाबत महायुती काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव देखील मैदानात...
मागील लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत ठरलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यंदाही लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे खैरेंचा पराभव झाल्याचं बोलले जाते, त्यामुळे जाधव चर्चेत आले होते. अशात आता पुन्हा जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संभाजीनगरमधील लढत रंगतदार होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :