(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजीनगर शहरात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
Chhatrapati Sambhaji Nagar News : सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 4 जुलै ते 18 जुलैपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार असुन, तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील असल्याने कायदा आणि सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार शहरात पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 4 जुलै ते 18 जुलैपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव हत्ये प्रकरणावरुन दलित समाजामध्ये असंतोष असून, त्या अनुषंगाने विविध दलित संघटना यांच्याकडुन धरणे, मोर्चे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. तर गायरान जमीन नावावर करण्यात यावी या मागणीकरीता विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्या वतीने धरणे, निदर्शने, मोर्चा इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने त्यास मुस्लीम तसेच इतर राजकीय पक्ष, संघटनांचा विरोध असुन त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण मिळावे त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. औद्योगिक तसेच इतर संघटीत-असंघटीत कामगार संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशिल असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी म्हणुन जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
आदेशात काय म्हटले आहे?
- शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या, किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही.
- दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगु नये, जमा करू नये किंवा तयार करता येणार नाही.
- कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही.
- जाहीरपणे घोषणा करू नये, गाणे किंवा त्यांचे ध्वनिमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनिक्षेपण करू नये.
- अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करू नये. सॉंग अगर हावभाव करू नये, आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तु तयार करू नये, त्याचे प्रदर्शन करू नये किंवा त्यांचा जनतेस प्रसार करता येणार नाही.
- संपूर्ण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही.
- आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाईस पात्र राहील.
इतर महत्वाच्या बातम्या:
विकृतपणा! 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना