(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विकृतपणा! 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज उद्योगनगरीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वाळूज महानगर परिसरात एका 10 वर्षीय मुलासोबत दोघांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. अनिकेत दणके आणि इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय मुलगा कुटुंबासह वाळूज उद्योगनगरीत राहतो. शनिवारी दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. बराच वेळ झाला, तरी तो घरी न परतल्याने, त्याच्या आईने मोठ्या मुलाला त्याला शोधून आणण्यासाठी पाठविले. दरम्यान, लहान भावाला नावाने हाका मारून मोठा भाऊ परिसरात त्याचा शोध घेत होता. याचवेळी एका खोलीमधून पीडित मुलाने आपल्या मोठ्या भावाला 'दादा, मला वाचव' अशी आरोळी दिली. त्यामुळे मोठ्या भावाने त्या आवाजावरून अनिकेत दणके याच्या घरात प्रवेश केला असता, अनिकेत हा लहान भावासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे दिसले. तिथे शेजारी इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद हाही होता. तर मोठ्या भावाला पाहून अनिकेतने पीडित मुलाला सोडून दिले.
विकृतांनी दिली जिवे मारण्याची धमकी
अनिकेत दणके आणि इरफान सय्यद या दोघा विकृतांनी घडलेला प्रकार कुणास सांगू नका, अन्यथा जीवे मारून टाक, अशी धमकी दोन्ही भावंडांना दिली. दरम्यान घरी गेल्यावर या भावांनी आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे पीडित मुलाच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अनिकेत आणि इरफान सय्यद या दोघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे करत आहेत. रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने उद्योगनगरीत सापळा रचून इरफान सय्यद यास ताब्यात घेतले असून, अनिकेत फरार आहे.
टोळक्याची दहशत...
रांजणगाव भागात असलेल्या बाळकृष्ण पेट्रोल पंपाजवळ नेहमी एक तरुणांची टोळकी घोळका करून उभे राहते. विशेष म्हणजे, यातील बहुतांश जण व्हाईटनर, गांजा, बटण आणि दारूची नशा करतात. तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड त्यांच्याकडून काढल्या जाते. त्यामुळे शाळकरी मुली आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हातात धारदार चाकू घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. त्यामुळे कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. तर त्यांच्याकडून यापूर्वी देखील इतर मुलांवर देखील अशाचप्रकारे अत्याचार झाल्याचं संशय आहे. त्यामुळे या गुंडांकडून अत्याचार केल्यास नागरिकांनी पोलिसांत धाव घ्यावी, त्यांचे नाव किंवा माहिती गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :