संदिपान भुमरे की चंद्रकांत खैरे? थेट विजयाचा आकडा सांगितला; संभाजीनगरसाठी अब्दुल सत्तारांची मोठी भविष्यवाणी!
संभाजीनगरची लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. कारण येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : येथे संपूर्ण जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. गावागात सध्या चालू असलेल्या राजकारणाविषयी चर्चा होत आहे. महायुतीने (Mahayuti) येथून मंत्री तथा संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे आज (22 एप्रिल) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथून कोण जिंकणार असे विचारले जात आहे. दरम्यान, संभाजीनगरच्या याच लढतीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मतदारसंघातूनक संदिपान भुमरे हे लाखो मतांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
बाबुराव कदम यांना हजारो मतांची लीड मिळणार
अब्दुल सत्तार आज (22 एप्रिल) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा प्रचार करण्यासाठी हिंगोलीत गेले होते. यावेळी त्यांनी हिंगोलीतील लढतीवर प्रतिक्रिया दिली. माझं ऑपरेशन झालेलं होतं, म्हणून मी काही दिवस आराम केला. मी आजच घराबाहेर निघालो. आज एवढ्या तापत्या उन्हात लोक हजारोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहिले. मी महिलांचेही धन्यवाद मानतो. मला खात्री आहे की या सर्कलमधून बाबुराव कदम यांना हजारो मतांची लीड मिळेल, असे सत्तार म्हणाले.
भुमरे लाखोंच्या मतांनी निवडून येणार
पुढे बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लढतीवरही प्रतिक्रिया दिली. येथून संदिपान भुमरे यांचाच विजय होणार, असं सत्तार म्हणाले. संदिपान भुमरे हे संभाजीनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. ते संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. भुमरे संभाजीनगरमधून लाखोंच्या मतांनी निवडून येतील, यात कुठलीही शंका नाही. कारण संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच भुमरे येथून जिंकतील, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
संभाजीनगर शहरातून तिहेरी लढत होणार आहे.
कारण चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे यांच्यासह येथून एमआयएमचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेदेखील तेथून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील हेदेखील येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भुमरे, खैरे यांना मतफुटीचा धोका निर्माण झाला आहे. यावरच सत्तार यांनी मत व्यक्त केले. विनोद पाटील चांगले नेते आहेत. ते चळवळीत काम करतात. ते मराठा समाजाचे सेवक आहेत. त्यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भुमरे यांच्या उमेदवारीला ते विरोध करतील, असं मला वाटत नाही. भुमरे यांच्या उमेदवारीचं त्यांनी स्वागतच केलंय, असं सत्तार म्हणाले.
हेही वाचा :
परभणीचे नरेंद्र मोदी आम्हीच, महादेव जानकर 26 एप्रिलनंतर रेल्वे स्टेशनवर झोपणार, संजय जाधव कडाडले!
कट्टर विरोधक सुजय विखे आणि संग्राम जगताप कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, नगरमध्ये भव्य शक्तीप्रदर्शन