काँग्रेसनं तिकीट दिलं नाही तरी विधानसभेला उभा राहणारच, प्रतिभा धानोरकरांच्या दिरानं बंडाचं निशाण फडकावलं
Maharashtra Assembly Election 2024 : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातही अनेक दिग्गज रिंगणात उतरणार असून काँग्रेस
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी इच्छुकांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) चांगलं यश मिळालं असल्याने काँग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातही (Warora-Bhadravati Assembly Constituency) अनेक दिग्गज रिंगणात उतरणार असून काँग्रेस नेते अनिल धानोरकर (Anil Dhanorkar) यांनी आता विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय.
मला जर काँग्रेसने तिकीट दिले नाही तरी मी निवडणुकीत उभा राहणार आहे. माझे सर्व ऑप्शन खुले असून इतर पक्ष माझ्या संपर्कात असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते अनिल धानोरकर यांनी केले आहे. भद्रावती नगरपरिषदेचे तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आणि शिवसेनेचे (Shiv Sena) माजी जिल्हाध्यक्ष अशी पदं अनिल धानोरकर यांनी भूषवली आहेत.
तिकीट वाटपात मोठी अडचण होणार
अनिल धानोरकर आता वरोरा विधानसभेसाठी इच्छुक असून दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे ते सख्खे मोठे बंधू आहेत. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्याकडून त्यांचे बंधू प्रवीण काकडे (Pravin Kakade) यांना वरोरा विधानसभेत उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता अनिल धानोरकर यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच हे स्पष्ट केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोर तिकीट वाटप करताना मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.
मला जर उमेदवारी मिळाली तरच...
मी केलेल्या कामाचा माझ्या परिवाराला निवडणुकीत नेहमी फायदा झाला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत मीच सर्वात प्रबळ दावेदार आहे. मला जर उमेदवारी मिळाली तरच काँग्रेस जिंकेल नाही तर सीट पडेल, त्यामुळे काँग्रेस मलाच सीट देईल, अशी अपेक्षा देखील अनिल धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार?
दरम्यान, प्रवीण काकडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच अनिल धानोरकर यांच्या गर्जनेमुळे काँगेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरातच निवडणुकीमुळे संघर्ष होणार आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली हे सुद्धा इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे. याबाबतीत चाचपणी सुरू आहे. अशातच अनिल धानोरकर यांची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
''भाजप आमदाराने आता मिशी कापावी''; पतीवरील टीकेला पत्नीचं उत्तर, काँग्रेस खासदारांचा पलटवार