एक्स्प्लोर
Advertisement
CAA Protests | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज दुसऱ्या दिवशीही देशात तीव्र आंदोलन सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले. काही ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी समर्थनार्थ देखील मोर्चे निघाले.
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज दुसऱ्या दिवशीही देशात तीव्र आंदोलन सुरु आहेत. विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले. औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन मुस्लिम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला. तिकडे नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियाँ मशिदीबाहेर जवळपास एक तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजानं मोर्चा निघाला. याशिवाय पुण्यातही मुस्लिम समाजाकडून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. एकीकडे शांततेत आंदोलन सुरु असताना दुसरीकडे बीड आणि जालन्यात मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.
परभणीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात कडकडीत बंद
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज परभणी बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परभणी, पुर्णा, पालम, मानवत हे चारही शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. शिवाय दुपारी दोन वाजता नमाज शहरातील ईदगाह मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हातात भगवे, पिवळे, हिरवे निळे झेंडे सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले होते. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाभरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एस टी बसला लक्ष्य करण्यात येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व डेपोच्या जवळपास 150 बस बंद ठेवण्यात आल्या होत्या.
वडाळा परिसरात रझा फाउंडेशनच्या वतीने निदर्शने
राष्ट्रीय नागरिकत्व सुधार कायद्याच्या विरोधात आज मुंबईतील वडाळा परिसरात रझा फाउंडेशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी या परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनेही केली. काल मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात भव्य निदर्शनं झाल्यानंतर आज वडाळा परिसरातील मुस्लिम बांधवांनी या परिसरात तीव्र निदर्शने केले. हातात काळे झेंडे दाखवत त्यांनी केंद्र सरकारचा, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. वडाळा परिसरात रझा फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या निदर्शनासाठी या संपूर्ण परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक तसेच अन्य समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बीड आणि हिंगोलीत बसेसवर दगडफेक
आंदोलनादरम्यान बीड आणि हिंगोलीत बसेसवर दगडफेक करण्यात आली. बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवर दगडफेक करण्यात आली, तसंच रास्तारोकोही करण्यात आला तर दुसरीकडे हिंगोलीतील कळमनुरी शहरामध्ये सकाळी एसटी बसेस फोडल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या नंतर परत एकदा अज्ञात जमावाने रस्त्यावर उतरत खाजगी वाहनांची तोडफोड केली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात आज बीडमध्ये बंद पाळण्यात आलाय जिल्ह्यातील अनेक भागात बंद पाळून या कायद्याला विरोध करण्यात आला. काल विद्यार्थी संघटनेकडून आक्रोश मोर्चा काढल्यानंतर आज बीड शहरातील बशीरगंज, माळीवेस, धोंडीपुरा, कारंजा परिसर कडकडीत बंद ठेवण्यात आला. तर शहरातील सुभाष रोडवरील मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने बंद ठेवण्यात आली. दरम्यान या कायद्याविरोधात देशभरात पडसाद उमटत असताना बीडमध्ये खबरदारी म्हणून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर परळीतील धरणे आंदोलनास समाजातील सगळ्या घटकातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
परळी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
केंद्र शासनाच्या नागरिकत्व कायद्याविरुद्ध परळी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात सर्व जाती-धर्माचे लोक यात सहभागी झाले होते. परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लोकांनी ठिया मांडून या कायद्याविरोधात आपले विचार व्यक्त केले. धरणे आंदोलनात विविध संघटनेने या ठिकाणी उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला.
जालन्यात आंदोलन
जालना जिल्ह्यातील अंबड येथे राष्ट्रीय नागरिकत्व कायद्या विरोधात सर्वधर्मीय लोकांनी आंदोलन केले. शहरातील मुख्य चौकातून मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांनी या कायद्याचा निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हा कायदा घटनेचे हणन करणारा असून सरकार ने हा कायदा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यात मुस्लिम सामाजिक संघटनांनी देखील भाग घेतला होता. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन देखील या आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिले.
नागरिकता विधेयकाविरोधात एमआयएमचे मुंडण आंदोलन
नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात राज्यभरातला मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमने विराट मोर्चा काढला. या पार्श्वभूमिवर बुलडाण्यात एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करत धरणे आंदोलन करण्यात आले. मुंडन आंदोलनात कापलेले केस हे पंतप्रधानांना पाठवणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विधेयक फाडून निषेध करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी कफन अंगाला गुंडाळून निषेध व्यक्त केला.
जळगावात भाविपकडून नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ सभा
नागरिकता संशोधन कायद्याचे (CAA) स्वागत व समर्थन आज अभाविपच्या वतीने मु.जे. महाविद्यालय प्रवेश द्वार येथे समर्थन सभा घेऊन करण्यात आले. अर्धवट माहिती घेऊन मोठ्या प्रमाणात हिंसाचार करणे योग्य नाही व राष्ट्र हित लक्षात घेऊन या कायद्याला समर्थन कराव व हा कायदा देशाच्या हिताचाच आहे अस आवाहन अभाविपच्या वतीने प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे व नगरमंत्री अश्विन सुरवाडे यांच्या वतीने करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोर्चा
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज दुपारी नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. We Support CAA अशा मजकूराचे फलक हातात घेत भोंसला मिलिटरी स्कूलच्या गेटपासून व्ही एन नाईक कॉलेजपर्यंत निघालेल्या या मोर्चात भाजपचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 'नरेंद्र मोदी, अमित शहा तुम आगे बढ़ो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement