Shegaon Kachori: शेगावची प्रसिद्ध कचोरी आता मिळणार रेल्वेतही, रेल्वेने सुरू केलं शेगाव स्थानकात अनोखं "रेल्वे कोच रेस्टॉरंट"
Buldhana News: 1950 सालापासून शेगावची ही प्रसिद्ध कचोरी रेल्वेत मिळत असे पण गेल्या दहा ते बारा वर्षापासून रेल्वेत ही कचोरी विकण्यास मनाई झाली होती. मात्र हीच कचोरी नवीन ग्लॅमरस रुपात तुम्हाला मिळणार आहे.

बुलढाणा: शेगावची कचोरी...! फक्त नाव ही घेतलं की तोंडाला पाणी सुटते... ! या कचोरीने साता समुद्रापार सुद्धा प्रसिद्धी मिळवलेली आहे. शेगावची जगप्रसिद्ध कचोरी आता तुम्हाला रेल्वेतही मिळणार आहे. रेल्वे विभागाच्या IRCTC विभागाने आता शेगाव रेल्वे स्थानकात एक रेल्वे कोच चक्क रेस्टॉरंट म्हणून बनवला आहे. या रेस्टॉरंटमध्ये आता लवकरच शेगावची सुप्रसिद्ध असलेली कचोरीचा आस्वाद आता तुम्हाला चोवीस तास घेता येणार आहे. ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेचे शेगाव स्टेशन... संत गजानन महाराजांची समाधी स्थळ शेगावातच आहे. शेगाव येथे दुसरी प्रसिद्ध गोष्टी म्हणजे येथील खुसखुशीत आणि चावदार कचोरी... असे सांगितले जात की 1950 मध्ये देशाची फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधून एक गृहस्थ शेगावात आले. तिरथराम करमचंद शर्मा असे त्यांचे नाव होते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी तेव्हा शेगाव रेल्वे स्थानकात काचोरी विकण्याच काम सुरू केलं. आज हीच कचोरी प्रसिद्ध झाली ती आपल्या चवीने...! आता त्यांची तिसरी पिढी या कचोरीचा व्यवसाय करत आहे. नाव मात्र टी.आर.शर्मा हेच आहे. त्यांचे अनेक वंशज शेगावात आज काचोरीचा व्यवसाय करतात.
1950 सालापासून शेगावची ही प्रसिद्ध कचोरी रेल्वेत मिळत असे पण गेल्या दहा ते बारा वर्षापासून रेल्वेत ही कचोरी विकण्यास मनाई झाली होती. मात्र आता हीच कचोरी नवीन ग्लॅमरस रुपात तुम्हाला मिळणार आहे. ती म्हणजे शेगाव रेल्वे स्थानकात नवीन सुरू होत असलेल्या "रेल्वे कोच रेस्टॉरंट" मध्ये....! येत्या 1 मे रोजी या रेल्वे कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन होणार असून हा वातानुकूलित रेल्वे कोच नुसता कोच नसून यात शेगावच्या कचोरीसोबत अस्सल वऱ्हाडी जेवणही मिळणार आहे. ही सेवा 24 तास सुरू असणार आहे. रेल्वेने सुरू केलेल्या या कोच रेस्टॉरंटमुळे शेगावात येणारे व कचोरी प्रेमी भाविकही खुश आहेत. बाहेरून जरी हा रेल्वेचा डबा वाटत असला तरी मात्र आतून ही एक रेस्टॉरंट असून सर्व सुविधा या कोच रेस्टॉरंट मध्ये आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच या रेल्वेच्या डब्यातील वातानुकूलित रेस्टॉरंट मध्ये बसून तुम्हाला शेगावची प्रसिद्ध कचोरी चाखायला मिळणार आहे.
कचोरी बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख
शेगावला दरवर्षी हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भुरळ घातली आहे. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावी नेण्याचा मोह आवरू शकत नाहीत. लोणारचं सरोवर, जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड, गजानन महाराजांचं शेगाव यानंतर ही कचोरी आता बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख बनली आहे.
पाहा व्हिडीओ :
हा व्हिडीओ 2017 साली एबीपी माझाने निवडणुकीदरम्यान मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी कित्येक वर्षांपासून अनेकांच्या पसंतीची ठरलेली प्रसिद्ध टि. आर. शर्मा यांच्या 'शेगाव कचोरी' ला भेट दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
