गण गण गणात बोते! संत गजानन महाराजांचा आज 146 वा प्रकट दिन, टाळ मृदंगाच्या गजराने शेगाव नगरी दुमदुमली
संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त शेगावमध्ये राज्यभरातून सातशेहून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे. टाळ मृदंगाच्या गजराने शेगाव नगरी दुमदुमली आहे.
शेगाव : संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन (Sant Gajanan Maharaj Prakat Din) आज साजरा होत आहे. यानिमित्त शेगावमध्ये राज्यभरातून सातशेहून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. टाळ मृदंगाच्या गजराने विदर्भपंढरी शेगाव (Shegaon) नगरी दुमदुमली आहे. श्रींच्या समाधी मंदिरावर, परिसर आणि प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दि. 25 फेब्रुवारीपासून श्रींच्या प्रकट दिन उत्सवास महारुद्रस्वाहाकारने प्रारंभ झाला आहे. श्रींच्या मंदिरात दररोज काकडा, भजन, दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. राज्यभरातून ठिकठिकाणच्या भजनी दिंड्या संतनगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. संपूर्ण विदर्भात मोठ्या भक्तिभावाने व उत्सवात हा प्रकट साजरा केला जात आहे.
नागपूरमध्ये गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह
नागपूरच्या (Nagpur) वेगवेगळ्या मंदिरात गजानन महाराज प्रकटदिन साजरा केला जात आहे. न्यू मनीषनगर भागातील जय दुर्गा सोसायटी सहामध्ये आज सकाळीच प्रकटदिन उत्सवाला सुरुवात झाली. सकाळी अभिषेकपूजा, पोथीवाचन व नंतर सामाजिक उपक्रम घेतले जात आहे. आज सुट्टीचा आल्याने नागरिकांचा देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रकट दिनाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आज श्रींचे मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता या महारुद्रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती होईल. त्यानंतर 12 वाजेपर्यंत कीर्तन पार पडेल. दुपारी चार वाजता श्रींची पालखी परिक्रमा मंदिरामधून शहरातील परिक्रमा मार्गाने निघेल. सायंकाळी ही परिक्रमा संपवून पालखी परत मंदिरात पोहोचेल. मंदिरात महाआरती व वारकऱ्यांचा नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडेल. त्यानंतर पालखी परिक्रमेची सांगता होईल. उद्या 4 मार्च रोजी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत काल्याचे किर्तनाने श्रींच्या प्रकट दिन उत्सवाची सांगता होणार आहे.
मोफत हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन
भाविकांसाठी स्थानिक अग्रसेन भवन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. माधवबाग अकोला (आकाशवाणी), श्री गजानन सेवा समिती व स्व ओमप्रकाश रामगोपाल गोयनका ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने मोफत हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अग्रसेन भवन येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत या शिबिरात हृदय रोग निदान तपासणी व अन्य तपासण्या केल्या जात आहेत.
आणखी वाचा
सोन्याच्या विमानासह 2250 कोटींचा महाल, 7000 वाहनांचा ताफा, एवढा श्रीमंत सुलतान आहे तरी कोण?