Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांचं आंदोलन, पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याने मजूर आक्रमक
Samruddhi Highway: सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे.
बुलढाणा: बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. हा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. नागपूर मुंबई जवळ आले ... रस्त्यावरून वाहने सुद्धा सुसाट धावायलाही लागल्या मात्र हा रस्ता तयार करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील या 300 च्या वर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.
बुलढाण्यातील पॅकेज सातचे काम या कंपनीने केलं असून तढेंगावं कॅम्प मधील तीनशेच्यावर मजुरांना त्यांची मजुरी तब्बल पाच महिन्यापासून मिळाली नाही असा आरोप या मजुरांचा आहे. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे.
रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीमार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करत होते. दिवसरात्र काम करून सुद्धा त्यांना घाम गाळलेल्या कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे तीनशे मजुरांनी किनगावराजा 15 किमी पायी जाऊन काल सायंकाळी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र राहेरी नदी पुलावर हा मजुराचा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात या मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन दिले जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमचो वेतन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मजुरांनी घेतली आहे.
कंपनीचे जे पी सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी एम एस आर डी सी ने अद्याप पर्यंत पैसे न दिल्याने कामगारांचे पैसे देता आले नाही. त्यामुळे या तीनशे मजुरांचे अडीच कोटी रुपये देणे बाकी असल्याचे ही सिंग यांनी सांगितले आहे. कामगारांनी थोडा धीर धरावा असे सिंग यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आता समृद्धी महामार्गावर काम केलेल्या या तीनशे मजुरांना केव्हा मजुरी मिळेल याकडे मजुरांच्या कुटुंबाचे लक्ष लागले आहे.
समृध्दी महामार्गाची वैशिष्ट्य :
1) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे.
2) कमाल गती घाटात प्रतितास शंभर किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर 150 किलोमीटर आहे.
3) नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक आठ तासात आणि मालवाहतूक 16 तासात शक्य होईल.
4) राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग
5) महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदरातून आणि नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगभरात व्यापार करू शकतील
6) नागपूर मधील मिहान शी अनेक जिल्हे जोडले जाणार
7) हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी सिद्ध