Lonar sarovar Buldhana: लोणार सरोवराच्या पाणी पातळीत पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक वाढ; सरोवरातील अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली
Lonar sarovar Buldhana: गेल्या काही वर्षात लोणार सरोवरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे आणि त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी वाढली असून या पाण्यात इतर पाणी मिसळल्याने लोणार सरोवराच्या पाण्याची गुणधर्म बदलत असल्याचेही चित्र आहे.

Lonar sarovar Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर (Lonar sarovar Buldhana) हे सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे निर्माण झालं. जगातील फार कमी उल्कापात सरोवरांपैकी हे एक आहे. सरोवराचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास सुमारे 1.8 किलोमीटरचा आहे तर सरोवराची खोली सुमारे दीडशे मीटर आहे व सरोवराचा परीघ सहा किलोमीटर आहे. या सरोवरात क्षारिय व खारट या दोन पाण्यामुळे सरोवरातील जीवसृष्टी ही इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या भौगोलिक व रासायनिक दृष्ट्या महत्त्वाच्या सरोवराचा अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदाच लोणार सरोवरातील पाण्याची पातळी ही रेकॉर्ड ब्रेक स्तरावर आली आहे व पाण्याची पातळी वाढल्याने लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन काळातील हेमाडपंथीय मंदिरे जसे कमळागड मंदिर, गणेश मंदिर , राम गया मंदिर हे मंदिरे पाण्याखाली गेली आहे. खरंतर दोन वर्षांपूर्वीच युनेस्कोने लोणार सरावाराला "जिओ हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपण मुळे या सरोवराचा अस्तित्व धोक्यात आल्याचं आता तज्ञांचे मत आहे. तर लोणार सरोवरात असलेलं पाण्याची PH वाढल्याचे अभ्यासक सांगतात.
गेल्या काही वर्षात लोणार सरोवरात मानवी हस्तक्षेप वाढला- सचिन कापूरे
गेल्या काही वर्षात लोणार सरोवरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे आणि त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी वाढली असून या पाण्यात इतर पाणी मिसळल्याने लोणार सरोवराच्या पाण्याची गुणधर्म बदलत असल्याचेही चित्र आहे, अशी माहिती लोणार सरोवर अभ्यासक सचिन कापूरे यांनी दिली.
गेल्या काही वर्षात नेमके कोणते मानवी हस्तक्षेप झाले?
1. लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात सोडल्या जात आहे.
2. सरोवराच्या तळाशी असलेल्या सुबाभूळ ही झाडे मोठ्या प्रमाणात वनविभागाने काढली आहेत.
3. पर्यटकांना जाण्यासाठी लोणार सरोवरा काठी एक रस्ता तयार करण्यात येत आहे त्यामुळे सरोवराच्या काठाची झीज होत आहे व माती मोठ्या प्रमाणात सरोवरात जात आहे.
4. पूर्वीच्या काळी लोणार सरोवरात काही प्रमाणात केळी व इतर फळांची शेती होत होती त्यामुळे लोणार सरोवरात जाणारं पाणी हे शेतीसाठी वापरल्या जात होतं व त्यामुळे सरोवराची पाण्याची पातळी स्थिर होती..
सरोवराची वाढती पातळी धोक्याची घंटा-
आगामी नवरात्र उत्सवात लोणार सरोवराच्या तळाशी असलेल्या कमळजा माता मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात मात्र आता हे मंदिर पूर्णपणे पाण्याने वेढल्या गेल्याने यावेळी नवरात्रीत भाविकांना जाता येणार नाही लोणार सरोवराची वाढती पातळी ही लोणार सरोवराच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे, असं सरोवर अभ्यासक सचिन कापूर यांनी सांगितले.

























