कपाशीला भाव नाही, बळीराजाचा साठवणुकीवर भर; राज्यातील जिनींग-प्रेसींग उद्योग ठप्प, 3 लाख कागारांवर उपासमारीची वेळ
गेल्या वर्षी कापसाला सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत होता आणि याही वर्षी तोच भाव असल्यानं शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे.
Buldhana News: कापसाला (Cotton) उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी सध्या तरी कापूस साठवणुकीवर भर दिला आहे . त्यामुळे कापूसच बाजारात नसल्यानं एकेकाळी राज्याचा वैभव असलेला कापूस आणि जिनिंग उद्योग सध्या ठप्प आहे. शेतकरी कापूस विकत नसल्यानं जिनिंग उद्योगासाठी लागणारा कच्चामाल बाजारातच उपलब्ध नसल्यानं राज्यातील साडेपाचशेपैकी पाचशे जिनिंग उद्योग हे सध्या बंद आहेत.
कधीकाळी राज्याचं वैभव असलेला कापूस आणि जिनिंग उद्योग सध्या संकटात सापडलेला आहे. राज्यातील साडेपाचशेपैकी पाचशे जिनिंग आणि त्याची यंत्रं सध्या बंद आहेत. वर्षभरात चार हजार कोटी रुपयांची उलाढाल असणारा हा उद्योग गेली दोन वर्षं बंद आहे. त्याचं कारण आहे, या जिनिंग उद्योगासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे, कापूस आणि कापूसच बाजारात मिळत नसल्यानं जिनिंग उद्योग सध्या डबघाईस आलेला आहे.
गेल्या वर्षी कापसाला सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत होता आणि याही वर्षी तोच भाव असल्यानं शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. गेल्या वर्षीचा चाळीस ते पन्नास टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवलेला आहे. याही वर्षी कापसाचा 70 टक्के हंगाम संपला असून शेतकऱ्यांच्या घरात कापूस आलेला आहे. मात्र, कापसाला खाजगी व्यापारी सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देत असल्यानं शेतकरी तो कापूस विक्रीसाठी बाजारात आणत नाही, कारण कापूस उत्पादनासाठी प्रतिक्विंटल यापेक्षा खर्च लागत असल्यानं शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांच्यावर भाव अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीस आणत नाही आणि योग्य भावाची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे.
राज्यातील जिनिंग उद्योग ठप्प
गेल्या दोन वर्षापासून जिनिंग उद्योग ठप्प असल्याने अनेक जिनिंग उद्योग हे तोट्यात जात आहेत. त्याचं कारण म्हणजे जिनिंग बंद असलं तरी विद्युत पुरवठा, सुरक्षा खर्च, इतर मेंटेनन्स यासाठी जिनिंगला खर्च लागतच आहेत. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्चामाल म्हणजे, कापसाला योग्य हमीभाव शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी जिनिंग उद्योगाचं मॅनेजर करत आहेत.
कापूस आणि जिनिंग उद्योग हे एकेकाळी राज्याचं वैभव होतं. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या परिसरात कापसाची लागवड आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे याच परिसरात मोठ्या प्रमाणात जिनिंग उद्योग आहेत. राज्यात एकूण 550 जिनिंग उद्योग असून यावर जवळपास तीन लाख कामगार आपली पोटाची खळगी भरत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिनिंग उद्योग ठप्प असल्यानं राज्यातील तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारनं यावर तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव कापसाला मिळाला पाहिजे याच्या हालचालींवर भर देण्याची आवश्यकता आहे.