Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका. 23 तारखेनंतर दयामाया दाखवणार नाही.
सांगोला: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बहुतांश वेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टात हेलपाटे घालण्यात जाईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी एवढे गुन्हे आणि भ्रष्टाचार करुन ठेवला आहे. या खोट्यानाट्या कामांचा तपास करावा लागणार. त्यामुळे 23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिंदेंना खुलासे देण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील. यावेळेला कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी सांगोल्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळेला महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता एकनाथ शिंदे तर होणार नाहीच, शिवाय दिल्लीत फडणवीसांची जी किंमत झाली आहे ती पाहता त्यांनाही विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही . यावेळी नवीनच एखादा चांगला विरोधी पक्ष नेता पाहायला मिळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केले. जयंत पाटील यांना जर लोकांमध्ये आपण मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याचे वाटत असेल तर शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा करावी. भाजपने 90 हजार गुजराती दलाल निवडणुकीसाठी आणले असून आता निवडणूक देखील गुजरातींच्या ताब्यात जाणार आहे. बरे झाले ही गोष्ट पंकजा मुंडे यांनी जाहीर केली, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांनाही लक्ष्य केले. आशिष शेलार यांनी बॉलीवूडचेच नाही तर हॉलिवूडचे जरी कलावंत आणले किंवा डोनाल्ड ट्रम्पला जरी आणले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
संजय राऊत शहाजी बापूंवर तुटून पडले
शहाजी बापूंनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा या वेळेला विधानसभेत निवडून येऊन दाखवावे या वेळेला त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झालेले दिसेल, असे संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत म्हटले. शहाजी बापू मोठ्या वल्गना करतात, त्यांचं डिपॉझिट राहील की नाही, याबाबत मला शंका आहे. त्यांनी मोठं आवाहन दिलं, राऊतांनी सांगोल्यात येऊन दाखवावं, मी आलोय. आता तुम्ही विधानसभेत पोहोचून दाखवा, हे आव्हान आम्ही देतो. असले आव्हान देणारे शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षांमध्ये खूप पाहिले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आणखी वाचा
तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल