Railway Waiting List : रेल्वेच्या वेटिंग लिस्टची झंझट संपणार, सगळ्यांना कन्फर्म तिकिट देण्यासाठी खास प्लान
Indian Railway : आता रेल्वे मंत्रालयाकडून सर्वांना कन्फर्म तिकिट देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. यासाठी एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
Railway Waiting List : मागील काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवास करताना अनेकांना आरक्षित तिकिट मिळवण्यासाठी खटपट करावी लागत आहे. अनेकांचे तिकिट कन्फर्म (Confirm Ticket) होत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या दिवसात कन्फर्म तिकिट मिळणे मोठं जिकरीचे असते. आता वेटिंग लिस्टची (Waiting List) झंझट संपवण्यासाठी रेल्वेने एक योजना तयार केली आहे. त्यासाठी रेल्वे एक लाख कोटींचा खर्च करणार असल्याचे वृत्त आहे.
रेल्वेने करणार एक लाख कोटी रुपयांचा खर्च
प्रवाशांची वाढती संख्या पाहता, रेल्वेने एक लाख कोटी रुपयांच्या नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'इकॉनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, प्रतीक्षा यादीचा त्रास दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे या मेगा योजनेवर काम करत आहे. या योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षानुवर्षे धावणाऱ्या गाड्यांचे जुने कोच बदलण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेच्या ताफ्यात 7 हजार ते 8 हजार नवीन गाड्यांचा समावेश होणार असल्याचे त्यांनी म्हटले. येत्या काही वर्षांत जुन्या गाड्या बदलून नव्या गाड्या आणल्या जातील. त्याचबरोबर प्रवाशांसाठी पुरेशा जागा उपलब्ध असतील असेही त्यांनी म्हटले.
वेटिंग तिकिटांचा त्रास कसा संपणार?
गाड्यांची संख्या वाढल्याने जागांची उपलब्धता वाढेल. गाड्यांची संख्या वाढली की कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. सध्या दररोज 2 कोटींहून अधिक प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. रेल्वे दररोज 10754 फेऱ्या चालवते. गाड्यांची संख्या वाढल्याने फेऱ्यांची संख्या वाढेल. यामध्ये दररोज 3000 जादा फेऱ्यांची भर पडल्यास वेटिंग लिस्टचा त्रास संपेल. 700 कोटी लोक दरवर्षी रेल्वेने प्रवास करतात. 2030 पर्यंत हा आकडा 1000 कोटींवर पोहोचेल. प्रवासी संख्या वाढल्याने गाड्यांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे. गाड्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढवल्यास रेल्वेतील वेटिंग तिकिटांची समस्या संपुष्टात येईल, असा अंदाज रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला.
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये गर्दी
मागील काही काळात लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असल्याचे दिसून आले आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तिकिट आरक्षित न झाल्याने सामान्य तिकिटावर प्रवास करावा लागतो. अनेकदा हे प्रवासी सामान्य डब्यात मोठी गर्दी असल्याने आरक्षित कोचमधून प्रवास करतात. त्यामुळे या आरक्षित डब्यातही मोठी गर्दी वाढते.