Chhagan Bhujbal : तुमच्यातील लढाऊपणा हरवला, मी ओबीसींसाठी लढतोय पण माझ्यावर अन्याय झाला; माळी समाजाच्या मेळाव्यात छगन भुजबळ काय म्हणाले?
Chhagan Bhujbal Shegaon Speech : इतर राज्यांतील आरक्षणाची आंदोलनं थांबली, पण आपल्या राज्यात तसं झालं नाही. तो जालनावाली काही ऐकायला तयार नाही असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
बुलढाणा : तुमच्यातील लढाऊपणा हरवला आहे, अन्याय आपल्यावरच होत आहे. माझ्यावर तर खूपच अन्याय झाला असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं. मराठा आंदोलनाच्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांची घरं जाळली. त्यावेळी मी तिथे गेलो आणि राजीमाना द्यायचा निर्णय घेतला असंही छगन भुजबळ म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्या माळी समाजाच्या युवक-युवती परिचय संमेलनाच्या उद्घाटनासाठी भुजबळ आले होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं.
व्हीपी सिंहांच्या सांगण्यावरून ओबीसी समाजाची सेवा करतोय
छगन भुजबळ म्हणाले की, "अशा कार्यक्रला जाणे मी टाळतो. कारण समाज एक असला तरी पक्ष वेगळे असतात, विचारसरणी वेगळी असते. मी ओबीसींच्या प्रश्नावर शिबसेना सोडली. मी नरसिंह राव यांच्याकडे गेलो. त्यावेळी नरसिंह राव यांनी ओबीसी समाजाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता. त्यातूनच समता परिषद स्थापन झाली. आदिवासी, दलित, ओपन आणि ओबीसी या चार वर्गात बाबासाहेबांनी समाजाला बांधलं. व्ही पी सिंहानी नंतर मंडळ आयोगासाठी काम केलं. त्यानंतर आपल्याला 30 टक्के आरक्षण मिळालं."
जातनिहाय जनगणना जाहीर करा
छगन भुजबळ म्हणाले की, "आपण आरक्षण घेतलं की लगेच कुणीतरी कोर्टात जातो. मंडळ आयोगाने ओबीसींना दिलेले आरक्षण संवैधानिक आहे. ओबीसींना प्रत्येक वेळेस काही मिळालं की कुणी तरी कोर्टात जातो. त्यावेळी जातीनिहाय जनगणना करायची मागणी आम्ही केली. मात्र आम्हाला फसवलं गेलं. 2016 पासून जाती निहाय जनगणनेची मागणी आहे. आम्ही मागणी करतोय की जाती निहाय जनगणना करा किंवा आम्ही 51 टक्के आहोत हे जाहीर करा."
तो जालनावाला ऐकायला तयार नाही
मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "मी मराठा समजाविरुद्ध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसींमध्ये 374 जाती एका ठिकाणी आहेत. त्यात तुम्ही म्हणजे मराठा समाज आला तर तुम्हालाही काही मिळणार नाही आणि आम्हलाही काही मिळणार नाही. अनेक राज्यात आरक्षणासाठी आंदोलनं सुरु होती. मोदी साहेबांनी 10 टक्के दिलं. त्यांची आंदोलनं थांबली मात्र राज्यातील मराठा समाजाचं आदोलन सुरूच राहिलं. मात्र हा जालनावाला ऐकायला तयार नाही. त्या गड्याला कोण सांगेल की आरक्षण मिळाल्यावर नोकरी मिळते कधी?"
त्यावेळी मी राजीनामा दिला
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये झालेल्या हिंसाचारावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "आमच्या आमदाराचे बीडमध्ये घर जाळून टाकलं. चार पाच मुस्लिम मुलांनी त्यांना वाचावलं. नमाज सोडला आणि आमच्या बायांना वाचावलं. माझ्या कार्यकर्त्यांच्या घरावर यांनी हल्ले केले, घरं जळाली. मग मी तिथं गेलो आणि पाहिलं. मग म्हटलं मी गप्प बसणार नाही. मी राजीनामा दिला. ओबीसींच्या हक्कासाठी मी लढलो, आम्ही कुणा समाजाच्या विरुद्ध नाही. मी लढतो आहे, तुम्ही सगळे ताकद द्या. लढाई संपलेली नाही. तुम्ही ताकद द्या. मला माझ्यासाठी आरक्षण नकोय, माझ्या समजाला गरज आहे."
सावित्रीबाई फुलेंच्या शाळेत पहिल्या दिवशी सर्व ब्राह्मण मुली
टाटा, बिर्लांपेक्षा महात्मा फुलेंचं बॅलेन्स शीट मोठं होत. इतर देशात महिला पुढे आहेत, महिलांना आपल्याकडे शिक्षण मिळालं पाहिजे. सावित्री बाईंच्या शाळेत पहिल्या दिवशी सर्व ब्राह्मण मुली होत्या. त्यांनी त्यावेळी अत्याचारग्रस्त मुलींना दत्तक घेतलं, त्यांचा सांभाळ केला. माळी समाजाने शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्यासोबत काम केलं असं छगन भुजबळ म्हणाले.