(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जनता बदमाश, मतदान करणारे चोर... ग्रामसेवकाचा महिला सरपंचाला भ्रष्टाचार कसा करायचा याचा पाठ; बुलढाण्यातील व्हिडीओ व्हायरल
Buldhana Viral Video : जनता ही बदमाश आणि मतदान करणारे चोर आहे असं हा ग्रामसेवक त्या महिला सरपंचाला सांगताना दिसतंय. यासंबंधी सीसीटीव्ही फुटेज चांगलच व्हायरल होताना दिसत आहे.
बुलढाणा: लोकशाहीमध्ये मतदार म्हणजे जनता राजा असून लोकप्रतिनीधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या भल्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. पण वस्तूस्थिती मात्र अगदी या विरुद्ध असल्याची दिसतेय. जनता ही बदमाश आणि मतदान करणारी चोर आहे असं बुलढाण्यातील (Buldhana) एक ग्रामसेवक महिला सरपंचाला सांगत आहे, आणि यापुढेही जाऊन भ्रष्टाचार (Corruption) कसा करायचा याचा पाठही देताना दिसत आहे. या संबंधित बुलढाण्यातील डोनगाव या ग्रामपंचायतीतील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (viral video) होत आहे.
भ्रष्टाचाराची (Corruption) मूळं समाजात किती खोलपर्यंत आणि किती खालच्या पातळीवर रुजलेली आहेत हे या व्हिडीओच्या (viral video) माध्यमातून दिसून येत आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचे सचिव ज्ञानेश्वर चनखोरे हे नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकवितानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव, महिला सारपंचाचा पती रवी पांडव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल आणि प्रदीप परमाळे असे सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसलेले असतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे.
ग्रामसचिव हा महिला सरपंचाला म्हणतो की , "पावसाळा लागला की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे, जसं जळतं तसं जळू द्यायचं. कारण जनता बदमाश आहे. शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केलं आहे. एकाही चोराने फुकट मतदान केलं नाही. मतदान करणारे चोर आहेत. आपण इथं पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे."
या सर्व संभाषणाचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागल आहे. हे संभाषण बाहेर आल्यावर आता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य आक्रमक झाले असून या सर्व प्रकाराची चौकशी करून या भ्रष्ट ग्रामसेवकावर कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे.
जनतेच्या जीवावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सेवेसाठी नोकरी करत असलेले सरकारी नोकरांची जर जनतेच्या प्रति ही मानसिकता असेल तर काय म्हणायचं. अशीच परिस्थीती कमी अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी असण्याची शक्यता आहे. मात्र नवख्या सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवणारे ग्रामसेवक मात्र जरा वेगळेच असतील. आता घडलेल्या या प्रकारावर आणि सीसीटीव्ही फुटेजवर बुलढाणा जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.