![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Buldhana News : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रुतीने करुन घेतली यशस्वी सुटका, मुलांना शाळेत एकट पाठवायचं की नाही?
Buldhana News : संग्रामपूरमध्ये दहा वर्षीय मुलीने शाळेत एकटी जात असताना मागून व्हॅनमधून आलेल्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून यशस्वी सुटका केली. पण या घटनेमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
![Buldhana News : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रुतीने करुन घेतली यशस्वी सुटका, मुलांना शाळेत एकट पाठवायचं की नाही? Buldhana News Shruti made a successful escape from the clutches of the kidnappers the issue of the safety of school children raises again Buldhana News : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रुतीने करुन घेतली यशस्वी सुटका, मुलांना शाळेत एकट पाठवायचं की नाही?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/2fe43447b793c46853bf3663b43e837f166306003532683_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Buldhana News : इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या दहा वर्षीय मुलीने शाळेत एकटी जात असताना मागून व्हॅनमधून आलेल्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून यशस्वी सुटका केल्याची घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात घडली आहे. या घटनेमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या चिमुरडीने अपहरण करणाऱ्या महिलेला रक्तबंबाळ करुन आपली सुटका करून घेतल्याने तिच्या सहसाचं कौतुक होत आहे.
श्रुती राऊत ही बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी इयत्तेत शिकते. आई-वडील नोकरीनिमित्त परभणी जिल्ह्यात असल्याने श्रुती आपल्या आजी-आजोंबासोबत राहून संग्रामपूर इथे शिक्षण घेत आहे. नियमित शाळेत जाताना मैत्रिणीसोबत जाऊ म्हणून श्रुती आधी मैत्रिणीकडे गेली. मात्र तिला ताप असल्याने श्रुती एकटीच शाळेकडे निघाली. रस्त्याने जात असताना निर्जनस्थळी मागून एक काळ्या रंगाची ओम्नी व्हॅन आली आणि श्रुतीजवळ थांबली.
क्षणाचाही विलंब न करता व्हॅनमधील महिलेने व्हॅनचा दरवाजा उघडून श्रुतीचा हात घट्ट पकडून "व्हॅन मध्ये बस नाही तर तुला मारुन टाकू," असं म्हणत व्हॅनमध्ये खेचलं. श्रुतीने आरडाओरडा करुनही आजूबाजूला कुणी नसल्याने मदत मिळाली नाही. संधी बघून श्रुतीने महिलेच्या हाताला जोरदार चावा घेतला. महिलेला जखमी करुन व्हॅनमधून उडी घेऊन ती शाळेकडे धावत गेली. यावेळी मात्र व्हॅन सुसाट वेगाने निघून गेली.
श्रुतीने तात्काळ शाळेत पोहोचून शिक्षकांना घडलेली घटना सांगितली. शिक्षकांनी ही तात्काळ पालकांना माहिती देऊन शाळेत बोलावून घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेचं गामभिर्य ओळखून बिनतारी संदेशाद्वारे जिल्ह्यात माहिती दिली. मात्र हा परिसर मध्यप्रदेशच्या सीमेनजीक असल्याने संबंधित व्हॅन मध्यप्रदेशात गेल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेची दखल घेत आणि श्रुतीच्या आजोबांच्या तक्रारीवरुन तामगाव पोलिसांनी अज्ञात महिलेसह तिघांवर अपहरणाचा आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची पथकं या अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर परिसरात मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आता शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंता वाढली आहे. मात्र श्रुतीने प्रसंगावधान राखत मोठ्या साहसाने आपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतल्याने परिसरात श्रुतीच्या सहसाचं कौतुक केलं जात आहे. संग्रामपूरच्या तहसीलदारांनी घटनेची माहिती घेत श्रुतीच्या घरी भेट देऊन तिचं कौतुक केलं आहे. मात्र परिसरात अजूनही पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील मुलं पळवणाऱ्या टोळीचं लोण आता लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातही पसरत आहे. समाजमाध्यमात व्हायरल होत असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे मात्र आता शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातून जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात जवळपास 130 जण बेपत्ता असून अजूनही पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेऊ शकलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)