Bird Flu In Uran: उरणमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव, मृत कोंबड्या आढळल्या; जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या महत्वाच्या सूचना
Bird Flu In Uran: उरणमधील चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे.
Bird Flu In Uran: उरणमधील चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा (Bird Flu) फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच उरणच्या परसदारातील 1 किमीपर्यंतचा क्षेत्र बर्ड फ्ल्यू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर परीसरात असणाऱ्या परसदारा भागात काही मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर या पक्षांचे नमुने तपासणीसाठी मध्यप्रदेशमधील कृषी संशोधन परीषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर या पक्षांचा मृत्यु एव्हीएन एन्फ्लूएंझा बर्ड फ्ल्यू या रोगाने झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या परिसरापासून 1 किमीपर्यंतचा परिसर बर्ड फ्ल्यू बाधित क्षेत्र, तर 10 किमीपर्यंतचा परीसर हा सर्वेक्षण क्षेत्र परिसर म्हणून घोषित केला आहे.
उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू-
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात 13 ते 16 जानेवारी दरम्यान जवळपास 42 कावळ्यांच्या अनपेक्षित मृत्यूची घटना घडली होती. या कावळ्यांचा मृत्यू ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) या विषाणूजन्य आजाराने (बर्ड फ्ल्यू ) झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झालय. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये आदेश निर्गमित केलेत. या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय आणि पाण्याची टाकी येथील 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) घोषित करण्यात आलाय. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आलाय. तसेच या परिसराचे सोडियम हायड्रोक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या आणि प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे
- डोळ्यांमध्ये लालसरपणा
- ताप
- खोकला
- घसा खवखवणे
- वाहणारे नाक
- स्नायू किंवा शरीरात वेदना
- डोकेदुखी
- थकवा
- श्वास घेण्यात अडचण
- अतिसार
- मळमळ
- उलट्या
- फीट येणे
बर्ड फ्लूपासून संरक्षण कसे कराल?
- वन्य पक्ष्यांशी संपर्क टाळा.
- आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
- आपले हात पाण्याने आणि साबणाने धुत राहणे महत्वाचे आहे.
- अन्न तयार करण्यापूर्वी वापरलेल्या वस्तू चांगल्या प्रकारे धुवा.
- अन्न व्यवस्थित शिजवून खा.
- बाहेर पडताना मास्क अवश्य घाला.
संबंधित बातमी:
Bird Flu : गाईच्या दुधात आढळला H5N1 बर्ड फ्लूचा विषाणू; दूध पिणे कितपत सुरक्षित?