Maharashtra Assembly Elections 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
Maharashtra Assembly Elections 2024 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य विदर्भामध्ये उमेदवार उभे करणार आहेत.
भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुठल्याही क्षणी जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य विदर्भामध्ये उमेदवार उभे करणार आहेत. काँग्रेसला पराभूत करून डॉ. बाबासाहेबांच्या पराभवाचा बदला घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 1954 च्या पोटनिवडणुकीत भंडाऱ्यात पराभव झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा पराभव काँग्रेसनं केल्याचा आरोप आजही केला जात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा बदला चुकता करायचाय, अशी भावना आता आंबेडकरी बांधवांमध्ये निर्माण झालीय.
विदर्भात सर्व जागांवर उमेदवार देणार
आजपर्यंत काँग्रेस असो किंवा भाजप यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी अनुसूचित जातीच्या लोकांचा वापर केलाय. मात्र, हा समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत असल्याचा आरोप समाज बांधवांनी केलाय. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात विदर्भात सर्व जागांवर रिपब्लिकन ऐक्याचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात येणार आहेत.
काँग्रेस, भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा संकल्प
भंडाऱ्यात रिपब्लिकन ऐक्यचा संकल्प मेळावा घेण्यात आला. या संकल्प मेळाव्यातून काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा संकल्प करण्यात आलाय. त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या मतांच्या भरोशावर आतापर्यंत निवडणुकीचं राजकारण होत होतं, त्यावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता रिपब्लिकन ऐक्य कोणत्या उमेदवारांना संधी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून तिढा
दरम्यान, विदर्भामध्ये 62 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 46 जागा काँग्रेसकडे आठ जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि आठ जागा शिवसेना ठाकरे गटाला असे वाटप झाल्याची माहिती मिळत आहे. विदर्भामध्ये आठ जागा मिळत असल्याने नाराज झालेल्या ठाकरे गटाने कोणत्याही परिस्थितीत 12 जागा मिळण्यासाठी आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. ठाकरे गटाला विदर्भामध्ये चार जागा अधिकच्या हव्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे.
आणखी वाचा