Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नाना पटोले विदर्भावर अडून बसले अन् संजय राऊतांची भर बैठकीत 'मशाल' पेटली! थेट दिल्लीत तक्रार
निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय व्हावा असा प्रयत्न महाविकास आघाडी करत असताना नाना पटोले यांची भूमिका अडचणीचे असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही घमासान सुरूच आहे. 260 जागांवर बोलणी झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी अजूनही 25 ते 30 जागांवर महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विशेष करून विदर्भातील जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये घमासान सुरू आहे. वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिके विरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील काही जागांवर अजूनही तिढा सुटलेला नाही. काल झालेल्या बैठकीमध्ये पण नाना पटोले आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने जागावाटपाची बोलणी पुढे जाऊ शकले नाही. पटोले यांच्या भूमिकेमुळे जागावाटपामध्ये अडचण निर्माण झाल्याचं ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा विषय त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे मांडला आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय व्हावा असा प्रयत्न महाविकास आघाडी करत असताना नाना पटोले यांची भूमिका अडचणीचे असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाकडे ठाकरे गटाकडून तक्रार करण्यात आली आहे. तत्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
विदर्भातील जागांवरून संजय राऊत काय म्हणाले?
जागा वाटपा संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की बऱ्याच जागा संदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले होते. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही सुद्धा माझं बोलणं झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटपाचा चर्चा पुढे सरकण्यासाठी बोलणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विदर्भातील काही जागांवर वाद असल्याचा संजय राऊत यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं आहे.
आम्ही रामटेकसारखी सहा वेळा निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. अमरावतीची सुद्धा जागा आम्ही दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा आम्ही दिल्या त्या जिंकल्या सुद्धा आहेत. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे विधानसभेला आम्हाला अधिक जागा मिळायला हव्यात हे समजून घ्यायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या