Bhandara News : ब्लॅक लिस्टेड गोशाळेकडे जनावरे सोपवण्यात आलीच कशी? गडचिरोली पोलिसांच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह
Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील बळीराम गोशाळा 2022 मध्ये काळ्या यादीत टाकली असताना कुरखेडा पोलिसांनी ब्लॅक लिस्टेड गोशाळेला एवढी जनावरं कशी काय दिली? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.
Bhandara News भंडारा : गोहत्या प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत आहे का? तसेच त्या मधील तरतुदींचा गैरफायदा घेवून पोलिसांनी पकडलेली जनावरे पुन्हा कत्तलींसाठी जात आहेत का? असा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील (Gadchiroli Police) कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन त्यांची पुढील सोय भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील धानोरीतील बळीराम गोशाळेत केली होती. मात्र, बळीराम गोशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यातील 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ब्लॅक लिस्टेड गोशाळेकडे जनावरे दिलीच कशी?
2022 मध्ये याच गोशाळेनं त्यांच्याकडील अनेक जनावरं मृत दाखवून त्यांना कत्तलीसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर बनावट मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या चार पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांसह गौशाळेच्या अध्यक्षांनी संचालक अशा 22 जणांवर कारवाई करण्यात आली होती. दोन वर्षांपासून ही गोशाळा काळ्या यादीत टाकली असताना कुरखेडा पोलिसांनी ब्लॅक लिस्टेड गोशाळेला एवढी जनावरं कशी काय दिलीत? गोशाळा बंद असताना गोशाळा अध्यक्षांनी ही सर्व जनावरं कशी काय घेतली? 139 जनावरांपैकी 40 दगावलीत तर, उर्वरित सुरक्षित आहेत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
ब्लॅक लिस्टेड गोशाळेतून तस्करीचं रॅकेट?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांनी गोठनगाव नाक्यावर 5 मार्चला चार ट्रकमधून कत्तलीकडं जाणाऱ्या जनावरांच्या वाहनांना थांबवून त्यातील तब्बल 139 जनावरांची सुटका केली होती. त्यानंतर या सर्व जनावरांच्या चारा-पाण्याची सोय आणि जनावरांची काळजी घेता यावी म्हणून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सिरसाळा येथील बळीराम गोशाळेच्या अध्यक्षांकडं ही सर्व जनावरं सांभाळायला दिलीत. मात्र, त्यातील तब्बल 40 जनावरं मेलीत आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गोशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. गोशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गोशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हतं. ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यामुळे ब्लॅक लिस्टेड गोशाळेतून गोतस्करीचं रॅकेट तर सुरू नाही ना, असा प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित होत आहे.
मागील वर्षी या गोशाळेच्या अध्यक्षांसह 13 संचालकांवर गुन्हा दाखल
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरी येथील बळीराम गोशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठविले होते. मात्र, बळीराम गोशाळेच्या संचालकांनी या जनावरांना निर्दयतेनं बांधून ठेवत त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही. रात्रीला यातील 40 जनावरे मृत पावली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेचे एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे, गोशाळा संचालकांनी त्यांच्याकडे आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना या गोशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेडही नसल्यानं ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आली असल्याचीही गंभीर बाब स्पष्ट होत आहे. मागील वर्षी या गौशाळेच्या अध्यक्षांसह 13 संचालकांवर गोशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती.