Bhandara Crime : भंडाऱ्यात मोक्काच्या आरोपीची गोळ्या झाडून हत्या, वाळूच्या व्यवसायातून वाद झाल्याचा अंदाज
Bhandara Crime : भंडाऱ्यातील तुमसर या ठिकाणी वाळूच्या व्यवसायातून टोळीयुद्ध सुरू झाल्याचं दिसून येतंय. त्यातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.
भंडारा : वाळूच्या व्यवसायातून मोक्काचा आरोपी असलेल्या एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Bhandara Tumsar Murder) करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. नईम खान (55) रा. तुमसर असे गोळीबारात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नईम खान याच्यावर तुमसर पोलिसात मोक्कासह विविध गुन्हे दाखल आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते वाळूचा व्यवसाय करत होता. त्यामुळे वाळूच्या व्यवसायात त्याची अनेकांशी स्पर्धा वाढली होती. यात त्याच्या साथीदारांनी वर्चस्व वाढवण्यासाठी अनेकांशी वाद वाढवून घेतले. यातूनच तुमसर येथे व्यावसायिक टोळीयुद्ध सुरू झाले. याच कारणातून नईम याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. नईम हा त्याच्या गाडीने गोबरवाहीकडे जात होता. यावेळी दुसऱ्या गाडीतून अज्ञात आरोपींनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला.
नईम याचे वाहन गोबरवाही गावाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ पोहचल्यावर मागावर असलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. यात नईम खान रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव, गोबरवाही ठाणेदार नितीन मदनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर हे आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
अहमदनगरमध्ये वाळू व्यावसायिकांची दादागिरी
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांकडून तलाठ्याला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात मंडळ अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळूचा ट्रॅक्टर (Illegel Sand) ताब्यात घेतल्यानंतर महिला अधिकारी ट्रॅक्टरवर असताना थेट ट्रॅक्टरवरून संशयितांनी त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
गेल्या काही वर्षात वाळू माफियांचा चांगलाच हैदोस पाहायला मिळत आहे. एकीकडे सरकारने वाळू धोरण आणले असले तरीही असे प्रकार उघडकीस येत असल्याने वाळू तस्करी (Sand Smuggling) नित्याची झाल्याचे चित्र आहे. मात्र अनेकदा काही धडाकेबाज अधिकारी अशा वाळू तस्करांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अशावेळी तस्करांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे देखील वारंवार निदर्शनास आले आहे. अशातच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्याच्या रागातून यावल (Jalgaon) तालुक्यातील महिला मंडळ अधिकाऱ्यास थेट ट्रॅक्टरवरून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: