(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cow Smuggling : भंडाऱ्यात गो तस्करीचं रॅकेट उघड, चार पशुवैद्यकिय डॉक्टरांसह गोशाळेच्या 13 संचालकांवर गुन्हे दाखल
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सिरसाळा इथं गो तस्करीचं रॅकेट (Cow Smuggling) उघड झालं आहे.
Cow Smuggling : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सिरसाळा इथं गो तस्करीचं रॅकेट (Cow Smuggling) उघड झालं आहे. येथील बळीराम गोशाळेतील 89 जनावरे परस्पर विकल्याचा तर, काही जनावरे मृत झाल्याचे निष्पन्न झालं आहे. तसेच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे पोस्टमार्टम न करताच गोशाळा व्यवस्थापनाला बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे. याप्रकरणी चार पशुवैद्यकिय डॉक्टरांसह गोशाळा चालवणाऱ्या 13 संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
89 जनावरे कत्तलखाण्यात विकल्याचा प्रकार
मागील दोन महिन्यात या गोशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, भंडारा जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन अंतर्गत तस्करीसाठी जाणाऱ्या गोधनाची सुटका करुन पवनीतील गोशाळेत पाठवले होते. मात्र, 152 जनावरांपैकी 89 जनावरे कत्तलखाण्यात विकल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गोशाळेच्या चौकशीचे आदेश दिले होते. पवनीचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांना चौकशीत गोशाळा येथील 89 जनावरे परस्पर विकल्याचा तर, काही जनावरे मृत झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे पोस्टमार्टम न करताच गोशाळा व्यवस्थापनाला बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिलेची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरुन पवनी पोलिसात चार पशु वैद्यकीय डॉक्टरसह गोशाळा चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात तीन महिला संचालकांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांसह संचालकांची नावे
याप्रकरणी डॉ. तुळशीराम शहारे, डॉ. हेमंतकुमार गभने, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. सुधाकर खूने या चार डॉक्टरांसह बळीराम गोशाळा सिरसाळाचे अध्यक्ष विसर्जन चौसरे, उपाध्यक्ष विपिन तलमले, सचिव मिलिंद बोरकर, सहसचिव खुशाल मुंडले, कोष्याध्यक्ष विलास तिघरे, सदस्य दत्तू मुनरतीवार, लता मसराम, वर्षा वैद्य, माया चौसरे, महेश मसराम, युवराज करकाळे, नानाजी पाटील, शिवशंकर मेश्राम या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनी तालुक्यातील सिरसाळा इथं बळीराम गोशाळा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून या गौशाळेत 152 जनावरे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 89 जनावरांची सदर गोशाळेच्या संचालकांनी परस्पर विक्री केली. तर, काही जनावरे मृत पावली असता डॉक्टरांकडून कुठल्याही प्रकारची तपासणी, पोलिसांना माहिती न देता किंवा शवविच्छेदन न करता परस्पर बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिले होते. हा सर्व गंभीर प्रकार समोर आल्याने सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गोतस्करीमध्ये चक्क पशु वैद्यकीय डॉक्टर समाविष्ट असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: