चिंता वाढली! बीडच्या 242 गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता, वैज्ञानिकांनी पाठवला सरकारला अहवाल
Beed News : राज्य शासनाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील 226 निरीक्षण विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्यात आली.
बीड : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यात पुढील काही दिवसांत नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईचा (Water Shortage) सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाउस झाला नसल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच बीड जिल्ह्यातल्या 242 गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे तसा अहवाल वरिष्ठ भु-वैज्ञानिकांनी सरकारकडे सादर केला आहे.
बीड जिल्ह्यातील 226 निरीक्षण विहिरीच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये शून्य ते दोन मीटर पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे 242 गावांना मार्च ते मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वरिष्ठ भू-वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. यासंदर्भातला अहवाल भू-वैज्ञानिकांनी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला पाठवला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील 226 निरीक्षण विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये पाणी पातळीमध्ये घट झाली असून, जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातील 242 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आलेला नाही. काही प्रकल्प तर अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यात 80 टक्के एवढाच पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च आणि मे महिन्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, माजलगाव वडवणी आणि धारूर या ठिकाणच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याच निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यातील धरणामध्ये केवळ 18 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक
नांदेड जिल्हा सोडता मराठवाड्यात यंदा सर्वच जिल्ह्यात सरासरी एवढा पाउस झालेला नाही. अशीच काही परिस्थिती बीड जिल्ह्यात सुद्धा आहे. बीड जिल्ह्यातील धरणामध्ये केवळ 18 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 79 टक्के पावसाची नोंद झाली असून, 143 लहान मोठ्या प्रकल्पामध्ये अजूनही पाण्याची आवकचं झाली नाही. जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांपैकी असलेल्या माजलगाव प्रकल्पात 12 टक्के, बिंदूसरा धरणामध्ये 18 टक्के, शिंदफना प्रकल्पात 57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, यंदा मार्च आणि मे महिन्यात जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोणती पाऊलं उचलली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: