मराठवाड्यातील दुष्काळावरून मनसे आक्रमक, बीडमध्ये केलं आंदोलन; कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Beed : बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठलीही मदत जाहीर करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला आहे.
बीड : मराठवाड्यातील (Marathwada) दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरून मनसे आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, बीड (Beed) जिल्ह्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आंदोलन करण्यात आले आहे. मनसेच्या वतीने आज (04 ऑक्टोबर) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सरकारच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. राज्याचे कृषिमंत्री बीड जिल्ह्यातलेच असून ते फक्त स्टंटबाजी करतात. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करायला हवी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे झालेल्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठलीही मदत या बैठकीत जाहीर करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजूर करण्यात यावा, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ सरकारने मदत करावी, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच, लवकरच लातूर ते तुळजापूर अशी शेतकरी बचाव यात्रा देखील मनसेच्या वतीने काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जोरदार घोषणाबाजी...
यंदा मराठवाड्यातील बहुतांश भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील प्रकल्पात फक्त 18 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मनसेकडून आज बीड शहरात आंदोलन करण्यात आले. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा म्हणून, यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
जिल्ह्यात वाईट परिस्थिती....
दुष्काळी जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या देखील याच जिल्ह्यात होतात. अशात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने बीड जिल्हा संकटात सापडला आहे. अनेक भागात पाण्याचे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तसेच विहिरी देखील आटल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. तर, याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आत्तापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
चिंता वाढणार! बीड जिल्ह्यात 79 टक्के पाऊस, धरणांमध्ये केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक