वाल्मिक कराडच्या मुलाने फोन केला, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला; बीडमध्ये मारहाण प्रकरणी शिवराज बांगर यांचा दावा
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या केल्याच्या घटनेनं महाराष्ट्रभर संताप व्यक्त झाला. याप्रकरणी, आरोपींना अटक करण्यात आली असून दोषारोपपत्रही दाखल झालं आहे. मात्र, या घटेनंतरही बीडमधील मारहाण आणि गुन्हेगारीचे व्हिडिओ समोर येत आहेत. बीड (Beed) जिल्ह्याच्या परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे (Shivraj Divte) या तरुणाला अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करत याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा असं हे आरोपी आपापसात बोलत असल्याचंही दिसून आलं. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ ही समोर आले. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ असून बीड जिल्ह्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून ज्या व्यक्तीला मारहाण केली, त्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) मुलाने फोन करुन पोलिसांना तक्रार न घेण्याचे सांगितले, असा दावा शिवराज बांगर यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी 10 आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, कालच्या प्रकरणातील आरोपी टोळीचा मोरक्या अदित्य बाबासाहेब गित्ते व सचिन विष्णू मुंडे यांच्यासह इतर 2 व्यक्तीने योगीराज अशोक गित्ते यांना अमानुष मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर योगीराज गित्ते हा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता, त्याची तक्रार घेऊ नये यासाठी वाल्मीक कराडचा छोटा मुलगा श्रीगणेश वाल्मीक कराड याने पोलीस स्टेशन परळी येथे कॉल केला होता. त्यामुळे, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असा दावा शिवराज बांगर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.
बीड बंदची हाक
दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या (19मे) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ही बंदची हाक शांततेत होणार असून बीडच्या नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारण्याचा ठरवले आहे, असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होत आहेत.
दोन गटांतील किरकोळ वाद
शिवराज दिवटे याच्या मित्रांनी परळी शहरातील समाधान मुंडे याला मारहाण केली होती. 16 मे रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही मारहाण झाली. त्यानंतर समाधान मुंडे याच्या मित्रांनी मिळून शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केली. समाधान मुंडे याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील तरुणांमधील किरकोळ वाद किती टोकाला पोहोचल्याचे दिसून आले. दिवटे याला झालेली मारहाण किरकोळ वादातून झाल्याचे पाहायला मिळते आहे.
मी बीडला भेट देणार - संजय शिरसाट
बीडमध्ये जे काही रोज एक-एक प्रकरणं समोर येत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की बीडची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी बीडला भेट देऊन माहिती घेतली, उपमुख्यमंत्री अजित दादांनी देखील माहिती घेतलेली आहे. बीडच्या गुंडांची जी दहशत वाढलेली आहे, त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात झाली आहे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले. तसेच, कालचं प्रकरण देखील अत्यंत संतापजनक आहे, येणाऱ्या काळात मी देखील बीडला भेट देणार आहे. ही सर्व माहिती पोलिसांनी तर दिलीच असेल पण मी देखील मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या जिल्ह्यावर गुन्हेगारीचा जो काही ठपका बसत चालला आहे, तो पुसला गेला पाहिजे, अशी अपेक्षा देखील शिरसाट यांनी व्यक्त केली.
हेही वाचा
Video संघर्षाचा काळ आठवला, सरन्यायाधीश भूषण गवई गहिवरले; आईंनाही अश्रू अनावर, पदराने डोळे पुसले
























