वाल्मिक कराडला 140 ऊस तोडणी यंत्र मालकांनी पोत्यात भरुन 11 कोटी पाठवले; पंढरपुरातील शेतकऱ्याचा गौप्यस्फोट
दिवसागणिक वाल्मिक कराडचा नव नवीन कारनामा समोर येत आहे. अशातच आता अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा गौप्यस्फोट पंढरपुरातील एका शेतकऱ्यानं केलाय.
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. सध्या वाल्मिक कराड हा एका खंडणी प्रकरणाच्या आरोपासंदर्भात सीआयडी कोठडीत आहे. दिवसागणिक वाल्मिक कराडचा नव नवीन कारनामा समोर येत आहे. अशातच आता अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा गौप्यस्फोट पंढरपुरातील एका शेतकऱ्यानं केला आहे. पैसे परत मागितल्यावर वाल्मिक कराडने मारहाण करुन हाकलून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हार्वेस्टिंग मशीनला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान देतो असे सांगून घेतले पैसे
वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचे रोज नवनवीन कारणामे समोर येऊ लागले आहेत. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करत असून या मशीनला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान देतो असे सांगून कराड याने या मशीन मालकांना प्रत्येकी 8 लाख रुपये देण्याचे सांगितले. तात्कालीन कृषीमंत्री हे माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असे कराड यांनी सांगितल्याचे नागणे यांनी सांगितले. यानंतर या 140 मशीन मालकांनी प्रत्येकी 8 लाख रुपये गोळा करुन ते एका पोत्यात भरले आणि हे पैसे मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना दिल्याचे नागणे यांनी सांगितले.
वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केली मारहाण
दरम्यान, या घटनेनंतर कुठल्याच प्रकारचे अनुदान न मिळाल्याने या मशीन मालकांनी वाल्मिक कराडला फोन करून आम्हाला अनुदान मिळाले नाही आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली. यावेळी त्यांना बीडला बोलवण्यात आले. यावेळी हे सर्व 140 मशीन मालक बीड येथे गेले असता तुमचे कोणते पैसे असे विचारत कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचे नागणे यांनी सांगितले. यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक झाल्याचे दिलीप नागणे यांनी सांगितले. वाल्मिक कराड यांच्या दहशतीमुळे आम्ही पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचेही नागणे यांनी सांगितले. आता वाल्मिक कराडल अटक झाल्यानंतर हे 140 मशीन मालक तक्रार देण्यासाठी पुढे येऊ शकतील असेही नागणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: